

तारळी प्रकल्पाच्या कारभारावर सयाजी शिंदे आक्रमक
हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोप
उत्खनन आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा
सातारा : विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या १,५०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Sayaji Shinde Legal Action on Tarali Pumped Storage Project)
प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्यांमधील अटींचे पालन झाले नसल्याचा, तसेच दगड, मुरूम आणि जांभा दगडाचे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना उत्खनन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या उत्खननातून शासनाचा तब्बल एक हजार कोटी रुपयांपर्यंतचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. स्वामित्वधन, दंड आणि अन्य शासकीय देणी अद्याप वसूल झालेली नसल्याचे कायदेशीर नोटिशीत नमूद आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून पर्यावरणीय परवानग्यांच्या अंमलबजावणीचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वन विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कथित उल्लंघनांवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तक्रारी आणि कागदोपत्री पुरावे सादर करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा विषय आता कायदेशीर पातळीवर नेण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड श्रीराम पिंगळे यांच्यामार्फत संबंधित जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना जाहीर नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत प्रकल्पातील कथित नियमबाह्य काम थांबवावे, उत्खननाचे अधिकृत मोजमाप करून शासनाची थकबाकी वसूल करावी आणि जबाबदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जबाबदारीचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तारळी प्रकल्पाच्या निमित्ताने शासनाचा महसूल, पर्यावरणीय नियम आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या तीन मुद्द्यांवर मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.
आता या आरोपांवर अदानी कंपनी आणि संबंधित शासकीय यंत्रणा काय स्पष्टीकरण देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.