भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे मिरा-भाईंदरसाठी योगदान काय?
मिरा-भाईंदर भाजपच्या वतीने दिवाळी स्नेहसंमेलन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवारी भाईंदर येथील सेव्हन इलेव्हन जिमखाना मैदानावर करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील विकासकामांसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या विकासकामांमधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपच्या योगदानाचा पाढाच वाचला.
मेहता म्हणाले की, मिरा-भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने गंभीर होत होता. शहराला स्टेम प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसीकडून अतिरिक्त ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला होता. २०१४ मध्ये हा निर्णय झाला, त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होते आणि राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते, असे सांगत त्यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीची आठवण करून दिली.
यानंतर शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, असे मेहता यांनी नमूद केले. त्यामुळे मिरा-भाईंदरच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने भाजपने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांनी केला.
पाणीपुरवठा प्रकल्पानंतर नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या वेळी शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली होती, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत असतानाही शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार घालत आंदोलन केले होते, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीमध्ये सत्तेत सहभागी आहेत. मात्र, मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा स्थानिक नेते प्रताप सरनाईक यांच्यात विविध मुद्द्यांवरून सातत्याने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरील हा वाद आता थेट राज्यातील नेतृत्वापर्यंत पोहोचत असल्याचे या भाषणातून स्पष्ट संकेत मिळत आहेत. मेहता यांनी विकासकामांचे श्रेय भाजपला देताना शिवसेनेच्या भूमिकेवर केलेली टीका ही केवळ स्थानिक राजकीय वक्तव्य नसून, महायुतीतील दोन्ही पक्षांमधील अंतर्गत मतभेदांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे महायुती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना दुसरीकडे मिरा-भाईंदरमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी
Ans: एकनाथ शिंदे यांचे मिरा-भाईंदर शहराच्या विकासासाठी नेमके काय योगदान आहे, असा थेट सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला.
Ans: शहरातील पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे.
Ans: नरेंद्र मेहता यांच्या टीकेचा रोख शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्याचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.






