सासवड सुपा रस्त्यावर ठेकेदार कंपनीकडून सुरक्षा विषयी उपाययोजना
पिसर्वे : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून सध्या सासवड-पिसर्वे-भिगवण या जिल्हा मार्गाचे नूतनीकरण सुरु आहे. राजपथ इन्फ्राकॉन ही खाजगी कंपनी हा रस्ता विकसित करत आहे. मात्र, हे करताना आवश्यक त्या सुरक्षा विषयक उपाययोजना ठेकेदार कंपनीकडून करण्यात आल्या नव्हत्या.
मागील आठवड्यात पारगावजवळ झालेल्या अपघातात एक तरुण मृत्युमुखी पडला होता. याबाबत दै. ‘नवराष्ट्र’ने आवाज उठवल्यानंतर प्रशासनास जाग आली. एक बळी गेल्यानंतर आता पारगाव ते खानवडी या अपघाती पट्ट्यात विविध सुरक्षा विषयक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सासवड-पिसर्वे दरम्यान असलेल्या पारगावनजीक राठी फार्मजवळ नुकताच रस्त्यावरील पुलाचे काम सुरु असलेल्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता. रस्ता बांधणाऱ्या कंपनीकडून सुरक्षाविषयक उपाययोजना राबवल्या नसल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.
सासवड भिगवण रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत दै. ‘नवराष्ट्र’ने वारंवार आवाज उठवला होता. पारगाव ते खानवडी फुलेपाटीपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना नसल्याबाबत दै. ‘नवराष्ट्र’मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ व ठेकेदार कंपनी राजपथ इन्फ्राकॉनच्या प्रशासनास जाग आली आहे.
कंपनीने अपघातग्रस्त ठिकाणच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून तो रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. तर पारगाव, राठी फार्म, खानवडी या दोन किमीपर्यंतच्या रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती केली. त्याचबरोबर पारगाव व खानवडी या दोन ठिकाणी काम सुरु असलेल्या पुलांजवळ चालू बंद होणारे लाल लाईटचे दिवे बसवण्यात आले असून, पत्र्याचे बॅरिकेटिंग दिशादर्शक सूचनाफलक, रेडीयम आदी उपाययोजना राबवल्याचे दिसून आले आहे.
दोन किमीमधील खराब झालेला रस्ता होतोय दुरुस्त
खूप वर्ष उपेक्षित असलेल्या या रस्त्याचा विकास होतोय ही जमेची बाजू असली तरी. ठेकेदार कंपनीने रस्ता वापरणाऱ्या लोकांचा वाहनांचा विचार करून पर्यायी व चांगला सेवा रस्ता उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. दै. ‘नवराष्ट्र’ने याबाबत आवाज उठवल्याने किमान या दोन किमीमधील खराब झालेला रस्ता दुरुस्त होऊन सुरक्षा उपाययोजना राबवल्या गेल्या. त्याबद्दल दै. ‘नवराष्ट्र’चे मनःपूर्वक आभार.