पुणे : अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी मागील पंधरवड्यात बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मोठा रोड शो (Road Show) केला होता. यावेळी त्यांच्या रॅली मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात पोहचल्याने आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही गट आता आपआपले शक्ती प्रदर्शन करीत आहेत. आता अजित पवारांच्यानंतर शरद पवार (President of NCP Sharad Pawar) पुण्यातून (Pune News) जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती असून, यासंबंधी तयारी सुरू असल्याची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे.
पुण्यातील शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक
येत्या काहीच दिवसांत पुण्यातील शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. याच बैठकीत या रोड शोचं आणि सभेचं पुढील नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबागेसमोरील गणेशकला क्रीडा या सभागृहात शरद पवारांची सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर शरद पवारदेखील रोड शो करत पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
आधी रोड शो नंतर सभा…
पुण्यात शरद पवारांचा गट आता अजित पवारांच्या गटाशी दोन हात करायला तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील शरद पवारांच्या रोड शोची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता शरद पवारांचा रोड शो पुण्यात कसा होतो आणि याच रोड शोचं सभेत रुपांतर होणार असल्याने शरद पवार सभेत अजित पवारांवर निशाणा साधणार का? कि ते पक्षबांधणीचा प्रयत्न कऱणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाचं वेगळं कार्यालय…
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलंबित करण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गट दोन हात करायला सज्ज झाला आहे. यासाठीच शरद पवारांच्या गटाने पिंपरी-चिंचवड स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. काळेवाडी परिसरात हे कार्यालय उभारलं आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन केलं जाईल.
अजित पवारांचा पावरफुल्ल रोड शो….
काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामती आणि पुण्यात दोन ठिकाणी रोड शो केला होता. त्यावेळी हजारोंनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले होते. ढोल ताशा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहात अजित पवारांचा रोड शो पार पडला होता. त्यावेळी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात अभिषेकदेखील केला होता.