कल्याण : कल्याण पूर्वेत सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारीमुळे नागरिक भीतीच्या वातावरणात आहे. एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला असताना एका अल्पवयीन मुलीची दिवसाढवळ्या तिच्यावर चाकूने वार करीत हत्या करण्यात आली. या प्रकरणात राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटाची मागणी आहे की, मोठी लोकसंख्या असलेल्या कल्याण पूर्वेत दोन पोलिस स्टेशन झाली पाहिजेत. पोलिसांचे मनुष्यबळ वाढविले पाहिजे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस काय करतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत मुलींवर अत्याचार, नागरिकांवर जीवघेणे हल्ले हे प्रकार सुरू असताना बुधवारी रात्री एका अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोर निर्घृणपणे हत्या केली. एका २० तरुणाने हा प्रकार केला. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापले
या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, लहान मुलीसोबत जे काही प्रकार घडत आहे. त्याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली असती तर मला वाटते हे प्रकरण या थराला गेले नसते. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या वाढलेली आहे. वारंवार पोलिस स्टेशन वाढविण्याची मागणी करीत आहे. पोलिस बळ वाढविणे गरजेचे आहे.
पोलिस स्टेशन वाढवण्याची गरज
या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ याना निवेदन आहे, कोचिंग क्लास, शाळा, काॅलेज या परिसरात बीट मार्शलची गस्त वाढविली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी एक पोलिस नेमावा. तर विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या मते कल्याण पश्चिमेत जितकी लोकसंख्या आहे. तितकीच लोकसंख्या कल्याण पूर्वेत आहे. कल्याण पश्चिमेत तीन पोलिस स्टेशन आहे. मात्र, कल्याण पूर्वेत एकच पोलिस स्टेशन आहे. आणखीन एक पोलिस स्टेशन झाले पाहिजे. पोलिसांचे मनुष्यबळही वाढले पाहिजे.
शिंदे फडणवीस सरकार अपयशी
या प्रकरणानंतर ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले की, केवळ कल्याणमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पत्रकार आणि महिलांवर हल्ले होत आहेत. त्यानंतर कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीची चाकूने झालेली हत्या पाहता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.