State level Kabaddi competition
पुणे : ७१ वी वरिष्ठ महिला आणि बुवा साळवी चषक ७१ वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ही स्पर्धा सोमवार १५ ते २० जुलै या कालावधीमध्ये म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलनातील बॅटमिंटन हॅाल येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती राज्य संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली. यावेळी संयोजन समितीचे दत्तात्रय झिंजुर्डे, अर्जुन शिंदे, नासिर सय्यद, शकुंतला खटावकर आदी उपस्थित होते.
महिलांचे एकूण 6 संघ असणार
तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने “राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे यांच्या विद्यमाने पुणे लिग कबड्डी स्पर्धा – २०२४ ” या स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आलेले आहे. सदर या स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड चाचणी पार पडली. त्या पैकी १०२ महिला व १५२ पुरुष खेळाडूंची निवड करून पुरुषांचे ८ संघ तर महिलांचे ६ संघ तयार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा असणार सहभाग
वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेले २५ जिल्ह्यांचे महिला व पुरुष संघ तसेच अ व ब दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील ठाणे जिल्हा शहर व ग्रामीण, मुंबई शहर मध्य व पश्चिम, मुंबई उपनगर मध्य व पश्चिम, नाशिक जिल्हा शहर व ग्रामीण, पुणे जिल्हा शहर व ग्रामीण आणि पिंपरी – चिंचवड शहर असे एकूण ३१ संघ या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत.
या अगोदरच्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातून पुरुष १२ व महिला १२ खेळाडू स्पर्धेत सहभागी होत होते परंतु महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नवीन धोरणानुसार आता पुणे जिल्ह्यातून पुरुष ३६ व महिला ३६ खेळाडू या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुणे शहर विभागातून महिला १२ व पुरुष १२, पिंपरी – चिंचवड शहरातून महिला १२ व पुरुष १२, तसेच पुणे ग्रामीण मधून महिला १२ व पुरुष १२ इत्यादी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जयंती निमित्त आयोजित केला जाणारा “ कबड्डी दिन ” या वेळी म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुलनातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित केला जाणार असून त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील कबड्डी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आजी – माजी खेळाडूंचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.
सदर हि स्पर्धा मॅटवर होणार असून ६ मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार अनुभवयास मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, संजय बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत. तर पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडेल.