'अश्लील गाणी लावाल, अनोळखी व्यक्तींना फुगे माराल तर...' होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी
होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. अनोळखी व्यक्तींवर फुगे मारणे, अश्लील गाणी गाण्यास, हावभाव इ. करण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांची नियमावली पोलिसांनी जारी केली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली. पोलिसांच्या नियमावलीनुसार, पादचाऱ्यांवर पाणी अथवा रंग उधळण्यास तसेच फुगे मारण्यास मनाई करण्यात आली आहे. अश्लील शब्द उच्चारणे, हावभाव करणे आणि अश्लील गाणी गाण्यास मुंबई पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. होळी आणि धुलीवंदनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ०७ अपर पोलीस आयुक्त, १९ पोलीस उप आयुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर १७६७ पोलीस अधिकारी आणि ९१४५ पोलीस अंमलदार बंदोबस्तकरिता तैनात करण्यात आले आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्युआरटी टीम, बीडीडीएस टीम तसेच होमगार्डसची तैनात करण्यात आले आहेत. तर दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना तसेच वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, अमली पदार्थांचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांवरच मुंबई पोलिसांकडून कायदेशी कारवाई केली जाणार आहे.