
kcr in pandharpur
पंढरपूर: राज्याच्या आगामी निवडणुकांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR In Pandharpur) यांची भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या तयारीत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात पक्षानं पाय रोवण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटनेचे नेते मोठ्या प्रमाणात या पक्षात प्रवेश करतायेत. मराठवाड्यातून केसीआर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या संख्येनं पक्षाच्या सभा होतायेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरात आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) आदल्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या वर्षी महापूजा करण्यासाठी 28 तारखेला पंढरपुरात पोहचतील. त्याच्या एक दिवस आधी 27 तारखेला केसीआर हे पंढरपुरात असणार आहेत. 26 तारखेला त्यांच्या मंत्रिमंडळासह ते सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी 300 गाड्या तैनात असणार आहेत. केसीआर 27 तारखेला पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतील आणि नंतर वाखरीत होणाऱ्या शेवटच्या माऊलीच्या रिंगणावर ते पुष्पवृष्टी करणार आहेत. आळंदीत वारकऱ्यांवर जो लाठीमार झाला, त्याचा निषेध करण्यासाठी ही पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
केसीआर यांची राजकीय खेळी
मराठा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा हा केसीआर यांचा प्रयत्न दिसतोय. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून त्यांनी ते भारत राष्ट्र समिती केलं आहे. देशाच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला पर्यायी सरकार देण्याचा केसीआर यांचा मानस आहे. या लढाईची सुरुवात ते महाराष्ट्रातून करतायेत. स्थानिक स्वराज्य संस्था, विधावसभा, लोकसभा निवडणुका त्यांच्या पक्षामार्फत लढवण्यात येणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 कोटी रुपरये खर्च करण्याची त्यांची तयारी असल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात प्रबळ पक्ष होण्याची त्यांची तयारी सुरु आहे, यातून ते भाजपा-शिंदे गट आणि मविआ यांच्यापुढं आव्हान निर्माण करण्याची रणनीती आखतायेत,असं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही नुकताच राष्ट्रवादी सोडून बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे. राज्यात पाय रोवण्यासआठी ते वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीही काढणार असल्याची माहिती आहे.
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न
दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकुटुंब आषाढी एकादशीला पंढरपुरात महापूजा करतात, मात्र त्यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळ कधीही हजर नसते. मात्र केसीआर त्यांच्या संपूर्ण मंत्रिमडळाला घेऊन पंढरपुरात येणार आहेत. यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. लाखो वारकरी पंढरपूर परिसरात असताना, पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण असतो. अशा स्थितीत केसीआर यांना पंढरपुरात येण्याची परवानगी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी पंढरपुरात येऊन त्यांना मात देण्याचा प्रयत्न केसीआर यांचा दिसतोय. वारकरी संप्रदायात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यानं त्यांनी आषाढीची संधी साधल्याचं मानण्यात येतंय. यातून त्यांना मोठी प्रसिद्धीही महाराष्ट्रात मिळण्याची शक्यता आहे.