ठाणे : विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर ट्र्कमधून खाली करत असताना ट्रॉलीचा शॉकऑप्सर तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या घरावर कोसळून ३ चिमुकल्यांचा हकनाक बळी गेल्याची घटना ठाण्याच्या भिवंडी भागात घडली आहे. बुधवार (२६ जानेवारी) दिवशी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
भिवंडी तालुक्याती टेंभिवली गावाच्या परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोळसा खाली करत असताना ट्रकचा शॉकअप्सर अचानक तुटला. त्यानंतर कोळशाने भरलेल्या ट्रकची ट्रॉली शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या झोपडीत वीटभट्टीवर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर रिकामा करत असताना अचानक त्याचा हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला या भीषण दुर्घटनेत या घरात राहणारे सर्वजण कोळशाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांना तात्काळ मदत कार्य राबवत सर्वांना बाहेर काढलं. मात्र, यामध्ये तीन मुलींची दुर्दैवी मृत्यू झाला.
टेंभिवली गावात असलेल्या वीटभट्टीवर कोळसा आवश्यक असतो. त्यासाठी तेथे ट्रकमधून सातत्याने कोळसा आणला जात असतो. मंगळवारीही कोळसा भरलेला ट्रक वीटभट्टीवर आला. ट्रकमधून कोळसा खाली करत असताना शॉकअप्सर तुटला आणि ट्रकची ट्रॉली थेट शेजारील झोपडीवर कोसळली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी झोपडीत मजुराची पत्नी आणि तीन मुले होती. दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला. तिन्ही बहिणी झोपडीत झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.