
कल्याण: कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायते गावाजवळ काल (सोमवार) सायंकाळी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायते नदीत दोन तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. घटना घडल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असले तरी, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रिन्स गुप्ता (वय १६) आणि राजन विश्वकर्मा (वय १८) हे दोन तरुण नदीकाठी आले होते. याच वेळी एक मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला, मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्याच्या तीव्र प्रवाहात सापडले आणि वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवले. टिटवाळा पोलीस, कल्याण तालुका पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात शोधकार्य चालवले. मात्र, अंधारामुळे हे कार्य थांबवावे लागले. आज (मंगळवारी) सकाळी सात वाजल्यापासून बचाव पथकांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे. नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या दोन्ही तरुणांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे रायते गावात तसेच परिसरात शोककळा पसरली असून, छठ सणाचा आनंद क्षणात विरला आहे. नदीकाठच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.