पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांची छापेमारी; कपड्यांसह ३५ लाखांच्या वस्तू जप्त
पुणे : पुण्यात नामांकित कंपन्यांचे वेगवेगळे स्टोअर चालविले जात असतानाच त्याच कंपन्यांच्या नावे बनावट वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने कोरेगांव पार्कसारख्या हायप्रोफाईल परिसरात एका ब्राँडेड कंपनीचे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केली आहे. येथून कपड्यांसह ३५ लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात दुकान मालक मोनिश लिलाराम अकतराय (वय २३, रा. ग्रीन व्हॅली, वानवडी) आणि सोनू राम लोकनादन (वय २६, रा. नवी सांगवी) तसेच एका महिलेवर कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ६३, ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मागदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस अंमलदार अमोल सरडे, पुष्पेद्र चव्हाण, निखिल जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ भागातील सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश
शहरात जगभरातील नावजलेले ब्राँडचे स्टोअर चालविले जातात. परंतु, त्यासोबतच वेगवेळया भागात या ब्राँडेड कंपनीचे बनावट लोगो वापरून त्या बनावट वस्तूंची विक्री केली जात आहे. दोन दिवसांपुर्वीच पोलिसांनी मध्यभागात कारवाई केली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या पथकाने संबंधित कंपनीचे अधिकृत प्रतिनीधींना घेऊन शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी कोरेगाव पार्क भागातील नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व कोरेगाव पार्क मधील मेन रोडवरील डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्समध्ये वेगवेगळ्या नामांकित अशा चार ब्राँडेड कंपनीचे कपडे व इतर वस्तू विकल्या जात असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलिसांनी याठिकाणी छापेमारी केली. तेव्हा बनावट लेबल व लोगोचा वापर करुन हुबेहुब दिसणारे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे.
कात्रजमधून बॅग, शूज अन् कपडे जप्त
पुणे शहरात एका नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या घटना सातत्याने घडत असून, पुन्हा एकदा कात्रज भागात कारवाई करून पोलिसांनी नामांकित कंपनीचा लोगो असलेले बॅग, शूज अन् कपडे विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी विक्रेता शिवम बाबूलाल गुप्ता (वय २४, रा. निपानी वस्ती, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर याबाबत पोलिसांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.