संभाजीनगर: मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय राहिला नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यावेळी आम्ही ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय राहिला नाही, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी घेतली आहे. ते संभाजीनगर येथे बोलत होते.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. परंतू ओबीसी समाजाने त्यांच्या मागणीला विरोध करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणासदर्भात लक्ष्मण हाकेंनी जनआक्रोश यात्रा सुरु केली आहे. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. माझे सरकारशी बोलणे झालेले नाही, पाऊस सुरू असल्याने ते त्यात व्यस्त आहेत.त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देणार नाही. पण आपला समाज मोठा करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहोत. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही, मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठा समाजापुढे ते शांत बसले नाही तर ते तुमचे राजकीय करीअर मराठा संपवून टाकतील.
याचवेळी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, याबाबत माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच, जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावाला, त्यांची वाट पाहू नये. असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.