Jitendra Awhad On Dilip Walse Patil : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP president Sharad Pawar) हे महाराष्ट्राचे उत्तुंग नेते असले तरी त्यांना एकहाती सत्ता आणता आली नसल्याचे वक्तव्य दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले. आपल्या वक्तव्यावर वळसे पाटील ठाम राहिले. इतकंच नाही तर अजित पवार गटानेदेखील वळसे पाटील यांची पाठराखण केली. वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील प्रतिआव्हान दिले आहे. शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन करावा आणि स्वबळावर दोन राज्यांत सत्ता स्थापन करावी, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड यांचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार यांचा इतिहास पाहणे गरजेचे आहे. पवार यांनी 40 व्या वर्षी इंदिरा गांधी यांच्या विरोधात संघर्ष केला आणि त्यांनी 60 आमदार निवडून आणले. वयाच्या 40 व्या वर्षी इंदिरा गांधी यांच्या विरोधात संघर्ष केला. याचे साक्षीदार स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत. कायम ते सत्तेत सहभागी झालेले आहेत.
बेनके शेट यांना किती त्रास दिला हे जगजाहीर
दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की आपण शरद पवारांना मोठा नेता म्हणतो… म्हणतो याचाच अर्थ ते मोठे नाहीत असं म्हणतात. तुम्ही तुमचा शेजारच्या तालुक्यातील बेनके शेट यांना किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. आम्ही कडक भूमिका घेऊ शकतो कारण आमचे मतदारसंघ स्वतः बांधले आहेत. माझ्याकडे तुमच्या सारखे कारखाने, बँक नाही. तुम्ही काल माफी मागितली आणि आज पुन्हा मतावर ठाम आहे असं म्हणता, असे आव्हाड यांनी म्हटले.
एवढं बोलण्याआधी राजीनामा तरी द्यायचा
तुम्ही एवढं शरद पवारांवर बोलतं असाल तर एवढं बोलण्याआधी राजीनामा तरी द्यायचा. शिवाजी महाराज यांनी तोरणा घेतला तेव्हासोबत काही मोजके सरदार होते आणि तुमच्या सारखे सरदार तलवार म्यान करुन बसले होते. असा टोला आव्हाड यांनी लगावला.
राष्ट्रवादी पक्ष चोरून न्यायचा प्रयत्न का करताय
शरद पवार यांनी बनवलेला पक्ष चोरून न्यायचा प्रयत्न का करताय, असा प्रश्न उपस्थित करत आता स्वत: चा पक्ष तयार करा आणि दोनदा राज्यांत निवडून आणा, असे आव्हान आव्हाड यांनी दिले. दिलीप वळसे पाटील तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही पक्षातून जात आहात हे सांगायला गेला होतात. त्यावेळी त्यांच्या पोटात काय कलवा कालव झाली हे मी त्यांच्या तोंडातून ऐकलं आहे असेही आव्हाड यांनी म्हटले.
वळसे पाटील यांनी दिलेल स्पष्टीकरण
मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
अजित पवार गटाकडून समर्थन
शरद पवारांच्या राजकीय सामर्थ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. मात्र, अजित पवार गटाने आपल्या नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन केले. दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवार यांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत असल्याचे ट्वीट अजित पवार गटांकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय, बंडापूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिपही ट्वीट करण्यात आली आहे.