वसई/ रविंद्र माने : धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समुद्राचे पाणी वेस ओलांडून सुरुच्या बागेत शिरल्यामुळे भुईगाव किनाऱ्यावरील शेकडो झाडे उध्वस्त होवून पडल्याची घटना शनिवारी घडली. वसईच्या किनारपट्टीवरील वसई,रानगाव,भुईगाव आणि अर्नाळा किनारी सुरुच्या बागा आहेत. गावे आणि सुमद्र यांच्यामधील दुवा आणि सांगड घालणाऱ्या या बागांमध्ये हजारो पर्यटक सफरीसाठी येत असतात.त्यामुळे या किनारी टपऱ्या वजा स्टाॅल लावून स्थानिक ग्रामस्थांनी उदरनिर्वाहाचे साधन सुरु केले होते.मात्र,काही समाजकंटकांनी या किनाऱ्यावरील वाळु आणि सुरुची झाडे तोडून नेल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या किनाऱ्यांची अधोगती सुरु झाली आहे.
त्यांना विरोध करणाऱ्यांचा विरोध पोलीस आणि राजकिय दबावाखाली गाडला जातो.परिणामी समुद्र गावात शेतात शिरुन ग्रामस्थ देशोधडीला लागतील अशी भिती व्यक्त करुन जागरुक वसईकरांनी समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्याची मागणी सातत्याने केली आहे.मात्र,त्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारी पहाटे आलेल्या भरतीत भुईगाव किनाऱ्यावरील शेकडो झाडे जमीनदोस्त झाली.त्यामुळे निसर्गसंपन्न सुरुची बाग भकास झाली आहे.भुईगावात गेल्या सहा वर्षापासून सहा वेळेला अशाच प्रकारे झाड पडत आहेत.
अर्नाळा गावातही घरात समुद्राचे पाणी शिरलं आहे.रानगावात तसेच भाईंदर-उत्तन येथे सुद्धा समुद्राचा पाणी गावात शिरलं आहे.हळूहळू हेच समुद्राच पाणी भुईगाव,नंदाखाल,अर्नाळा भागात शिरण्याची भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे गावे वाचवण्यासाठी राज्यकर्त्यांनी,नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे.वाढवण बंदरासाठी समुद्रात ५० हेक्टर भराव करण्यासाठी डोंगर सपाट केले जाणार आहेत,यापुढे असे अनेक असे प्रकल्प येत आहेत.ते रोखायला हवेत.देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३६ टक्के क्षेत्रफळ वनविभाग म्हणून आवश्यक असताना,ते १८ टक्क्यावर आले आहे.भाईंदरला मेट्रो कारशेड बांधण्यासाठी उत्तर डोंगरीतील २१ हजार झाडांची कत्तल करण्याचं सरकारने ठरविले आहे.अशा पद्धतीने सरकारच पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी सांगितले.
वारंवार मागणी करुन आणि समुद्र वेस ओलांडण्याचे धोके निदर्शनास आणूनही शासन दरबारी फक्त कागद रंगवून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे.समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्याची मागणी सागरी महामंडळ पालघर यांच्याकडे केली होती.मात्र,त्यांनी ती जबाबदारी किनारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागावर ढकलली आहे.त्यामुळे या लालफितीत वसईतील किनाऱ्या लगतची गावे वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे डाबरे यांनी सांगितले आहे.