फोटो सौजन्य सोशल मिडिया
Wardha News : यंदा मान्सून काळात जिल्ह्यात सरासरीच्या तुलने समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय सुपर अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचा मोठा खंड कायम राहिल्याने जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढावली. मध्यंतरी शासनाच्या वतीने दुष्काळ ट्रिगर-१ च्या यादीत जिल्ह्यातील ७ तालुक्यांचा समावेश केला होता. तर बुधवारी दुष्काळ ट्रिगर-२ तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश आहे. परिणामी जिल्ह्यावरील दुष्काळाचे ढग आणखी गडद झाले असून आगामी काळात जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटेल हे जणू निश्चितच झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८७४.०५ मिमी पाऊस पडतो. पण यंदाच्या वर्षी मान्सून काळातील संबंधित चार महिन्यात केवळ ५५८.०३ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला. म्हणजेच जिल्ह्यात पावसाची तब्बल ३६.९२ टक्के तूट राहिली. तर ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवस उलटूनही पावसाचा खंड काम आहे. अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील जलाशयांतही नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. तर वाढत्या तापमानामुळे भू-गर्भातील पाणी पातळीही झपाट्याने खाली जात आहे. शिवाय पाण्याअभावी पीके माना टाकत आहे. इतकेच नव्हे तर आगामी काळात जिल्ह्यात चारा व पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहे.
गत महिन्यात शासनाच्यावतीने दुष्काळी ट्रिगर-१ लागू करण्यात आलेल्या तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात वर्धा जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, कारंजा तालुक्याला वगळण्यात आले होते. तर बुधवारी दुष्काळी ट्रिगर-२ लागू करण्यात आलेल्या तालुक्याची यादी शासनाने जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने करावा लागेल वापर जिल्ह्यातील जलाशयांत नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. तर आगामी काळात अल-निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. शिवाय भू-गर्भातील पाणी पातळीही झपाट्याने खाली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना आगामी जलसंकटावर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा आतापासूनच काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
आगामी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपायोजनांचे नियोजन केले जात आहे, चारा व पाणीटंचाईचा प्रश्न ज्या प्रमाणे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सतावणार आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील जंगल व्याप्त परिसरातीलही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत तृण भक्षींचे खाद्य आगामी काळात जणू नाहीसेच होणार आहे, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करताना वन्यप्राण्यानाही जंगलात पाणी व त्यांचे खाद्य मिळावे याकरिताचेही नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.






