बीड: ‘बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांना मंत्रीपद मिळाल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यात ही बाब खुपतय आहे.’ असं सांगत आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी धनंजय मुंडेवरील आरोप फेटाळून लावले. संतोष देशमुख प्रकरणात या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील आरोपी वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय अशी ओळख होती. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतरही वाल्मिकने धनंजय मुंडेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची मैत्री वाढू लागली. गेल्या दहा वर्षात बीडच्या राजकारणात धनंजय मुंडेंचे दबदबा वाढला, त्यामुळे वाल्मिक कराडचे वर्चस्वही वाढू लागले. त्यामुळे बीडच्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा? याचेही निर्णय वाल्मिकच्या मर्जीने होऊ लागले होते, अशी चर्चा आहे. पण 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. तेव्हापासून वाल्मिक फरार होता. अखेर 31 डिसेंबरला त्याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले.
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी आणि बीड येथे आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हालचालीही सुरू केल्या. त्याअंतर्गत परळीतील ‘जगमित्र’ कार्यालयाची जबाबदारी त्यांच्या चुलत भाऊ अजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली. पूर्वी हे कार्यालय वाल्मिक कराड पाहत होता. मात्र, कराड यांच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी सगळी सूत्र अजय मुंडेंच्या हातात सोपवली. पण त्याचवेळी हे अजय मुंडे कोण आहेत. असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला.
अजय मुंडे हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक सक्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू आहेत. त्यांनी परळी मतदारसंघातील ‘जगमित्र’ कार्यालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. पूर्वी हे कार्यालय वाल्मिक कराड पाहत होते, परंतु त्यांच्या अटकेनंतर अजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजय मुंडे हे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि गटनेते आहेत. त्यांनी पिंपरी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला आहे. तसेच, ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरीचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत, अजय मुंडे मतदारसंघात सक्रिय राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य करतात. त्यांच्या या भूमिकेमुळे ते परळी मतदारसंघातील राजकारणात महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जातात.