Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Yavatmal News: जन्म आणि मृत्यूच्या प्रत्येक घटनेची नोंदणी निर्धारित कालावधीत करणे आवश्यक असून, जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणालीचा (सीआरएस) वापर करणे बंधनकारक करण्यात आले. जन्म किंवा मृत्यू झाल्यापासून २१ दिवसांच्या आत नोंदणी केल्यास आता कोणतेही शुल्क लागत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जन्म-मृत्यूच्या घटनांची वेळेत नोंदणी करावी, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.(फोटो सौजन्य – AI)
जन्म-मृत्यूच्या सर्व घटनांची नोंदणी केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली सीआरएस या ऑनलाइन प्रणालीवर करणेच बंधनकारक झाले. यामुळे सर्व निबंधकांनी दाखले ऑनलाइन प्रणालीद्वारेच वितरित करावेत, असे निर्देश देण्यात आले. जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारित) अधिनियमानुसार सर्वप्रकारच्या शासकीय कामांसाठी आता सीआरएस प्रणालीद्वारे दिलेला जन्म-मृत्यू दाखलाच वैध व उपयुक्त ठरेल.
२१ दिवसांनंतर नोंदणी केल्यास कालावधीनुसार प्रक्रिया व मंजुरी आवश्यक राहणार आहे. त्यानुसार २१ ते ३० दिवसांच्या आत नोंदणी केल्यास स्थानिक निबंधक कार्यालयात विलंब शुल्क भरून दाखला मिळवता येईल. ३० दिवसांनंतर १ वर्षाच्या आत नोंदणीसाठी स्थानिक निबंधकांकडे अर्ज करावा लागेल. या अर्जाला जिल्हा आरोग्य अधिकारी यांची मान्यता आवश्यक राहील. १ ते २ वर्ष विलंब झाल्यास नोंदणीसाठी संबंधित तहसीलदार यांचा आदेश बंधनकारक राहील. हा आदेश सीआरएस प्रणालीवर अपलोड केल्यानंतरच दाखला मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय जन्म-मृत्यू नोंदणी समन्वय सभेत जिल्हाधिकारी मीना यांनी जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमातील तरतुदी, नोंदणीची प्रक्रिया आणि प्रमाणपत्र वितरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत स्थानिक निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. २१ दिवसांच्या आत नोंदणी केल्यास कुठलेही शुल्क लागणार नाही, सोबतच यासाठी कोणत्याही मंजुरीची किंवा आदेशाची आवश्यकता राहणार नाही. नोंदणीनंतर निबंधकांनी नागरिकांना तत्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
२ वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्यास नोंदणीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचा आदेश अनिवार्य राहील. हा आदेश प्रणालीवर अपलोड करून निबंधकांमार्फत प्रमाणपत्र वितरित केले जाईल. तसेच ज्या नागरिकांकडे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वीच्या नोंदींसाठी जुने जन्म मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध आहे. त्यांना क्युआर कोड असलेले नवीन प्रमाणपत्र हवे असल्यास नागरिकांनी स्थानिक जन्म मृत्यू निबंध कार्यालयात अर्ज केल्यानंतर अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असेल. अर्ज केल्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मान्यतेने नवीन प्रमाणपत्र मिळेल. शहरी भागात अर्ज केल्यानंतर सहाय्यक आयुक्त तथा अपर जिल्हा निबंधक (शहर), नगरपालिका प्रशासन यांच्या मान्यतेने प्रमाणपत्र दिले जाईल.
Ans: यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएस (CRS – Civil Registration System) पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.
Ans: दिलेल्या बातमीनुसार, जन्माची नोंदणी जन्म झाल्यापासून २१ दिवसांच्या आत करावी.
Ans: CRS म्हणजे Civil Registration System. या प्रणालीद्वारे देशातील जन्म आणि मृत्यूच्या घटनांची अधिकृत नोंद ठेवली जाते.






