Yogesh Kadam reacts to Saif Ali Khan attack case
पुणे : बॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यामध्ये सैफवर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आले आहे. या प्रकरणावर पोलीस जोरदार तपास करत आहे. मात्र या हल्ल्यामध्ये अनेक राजकारण्यांनी प्रतिक्रिया देत हा हल्ला कट्टरवादीयांकडून करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. यावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज (दि.17) पुणे पोलीस आयुक्तालयास भेट दिली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अनेक विषयांवर चर्चा केली. बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील वांद्रे भागात सैफ अली खान याच्या निवासस्थानात शिरुन हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. यापूर्वी वांद्रे भागात अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला. माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमागे लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात आहे. खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, ‘सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे गुन्हेगारी टोळीचा हात नाही. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील छबीत एक संशयित आढळून आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे.’ अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे योगेश कदम म्हणाले की, “खान याच्या अपार्टमेंटच्या परिसरात सुरक्षारक्षक नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू असून, संशयितांच्या मागावर पोलीस आहेत,” अशी माहिती गृहराज्यमंत्रि योगेश कदम यांनी दिली आहे.