तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहवरची लोकप्रिय मालिका घेणार निरोप, अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं...
मालिका आणि प्रेक्षकांचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे, स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’… या मालिकेने कोरोना काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या साडे चार वर्षांहून अधिक दिवस ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. डिसेंबर २०१९ पासून टेलिकास्ट झालेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी कायम राहिलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांच्या समोर आलेले ट्वीस्ट पाहून मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद मिळत नव्हता. अनेकदा नेटकऱ्यांनी मालिका बंद करण्याचीच मागणी केली होती. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ही मालिका बंद होणार असून हिच्या जागी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत असलेले ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही सीरियल सुरू होणार आहे. ही सीरियल २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होत असल्याची अधिकृत माहिती मालिकेतील प्रमुख कलाकार अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता मिलिंद गवळी म्हणतात, “मी मिलिंद गवळी, स्टार प्रवाह परिवार आणि Director’s Kut Prodn कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची “आई कुठे काय करते” ही स्टार प्रवाहवरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता, या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात स्टारप्रवाहने “आई कुठे काय करते”चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती, त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली. ती इतकी भावली की अक्षरश: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं.”
हे देखील वाचा – बिग बॉस १८ नवा होस्ट? हा शोचा जुना स्पर्धक करणार होस्टिंग
“आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजन शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीश राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते “होऊ दे धिंगाणा” किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली. DKPचे विवेक भाई, आरिफ भाई रणजीतजी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही ४५ ते ५० वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम, पोलिस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घरं, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं.”
“त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये. असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले, आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही. नमिता वर्तक यांची कथा पटकथा खूप भारी होती. या सीरियलचे संवाद छान असायचे. प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार या सिरीयल मध्ये एकापेक्षा एक कलाकार होते. आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचन आई, अरुंधती, संजना, अभी, यश, इशा, अनघा, विमल, शेखर, विशाखा, आरोही, गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्या ताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी हा सर्वांचा आभारी आहे.”