मनिषा कोईरालाच्या विधानाने खळबळ
नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी करणारे निदर्शने गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. आता काही प्रसिद्ध व्यक्तींनीही लोकशाहीला अपयशी ठरवण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री मनीषा कोइरालाचे नाव या यादीत जोडले गेले आहे. तिने थेट नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी केली आहे.
अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती आणि कर्करोगातून वाचलेल्या मनीषा कोइरालाने लंडनमधील एका विशेष कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. ‘हिअर अँड नाऊ ३६५’ च्या ताज ५१ बकिंगहॅम गेट चेंबर्समध्ये आयोजित या कार्यक्रमात मनीषाने ब्रिटिश-भारतीय उद्योजक मनीष तिवारी यांच्याशी संवाद साधत नेपाळचे राजकारण, आरोग्य आणि तिच्या जीवनातील अनुभवांवर चर्चा केली, काय म्हणाली मनिषा जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
नेपाळच्या राजकारणाबाबत मनिषाचे विचार
नेपाळच्या राजकारणाबद्दल आपले विचार व्यक्त करताना मनीषा म्हणाली की, ‘नेपाळमधील प्रत्येक नेता मागील नेत्याचे काम उलट करतो, त्यामुळे नेपाळमध्ये लोकशाही व्यवस्थित चालत नाही आणि येथे कोणतेही सरकार जास्त काळ टिकत नाही.’ तथापि, तिने स्वतःला पूर्ण लोकशाहीवादी म्हणून वर्णन केले, परंतु म्हणाली, ‘मी लोकशाहीवादी आहे पण मला वाटते की नेपाळला स्थिरतेसाठी राजेशाहीची आवश्यकता आहे.’
जेव्हा ब्रिटिश-भारतीय उद्योजक मनीष तिवारी यांनी तिला तिच्या कुटुंबाचा राजकीय वारसा आणि प्रसिद्धी यांच्यातील संतुलनाबद्दल विचारले तेव्हा मनीषाने उत्तर दिले, “मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे पण, मला काळजी वाटते की आपल्याला आदर आणि स्थिरता हवी आहे. आपल्याला सरकारपेक्षा मजबूत संस्थांची आवश्यकता आहे.”
कर्करोगाबाबत झाली व्यक्त
गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तिच्या दुःखद अनुभवाची आठवण करून देताना मनीषा म्हणाली, ‘डॉक्टरांनी मला कर्करोग झाल्याचे सांगितले तेव्हा मला वाटले की आता सर्व काही संपलं आहे, पण देवाच्या कृपेने मी वाचले. मी पुन्हा जगायला शिकले. ताकद ही मोठी कामगिरी नाही, ती छोट्या निर्णयांचे परिणाम आहे. परिस्थिती काहीही असो, धैर्य ठेवायला हवे.’
कारकिर्दीबाबत मांडले मत
मनीषा तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगते की तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ती म्हणाली, ‘मी बारावीही पूर्ण केली नव्हती आणि अचानक दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यासोबत काम करण्याची ऑफर मिळाली आणि मी सेटवर होते!’
‘१९४२: अ लव्ह स्टोरी’, ‘बॉम्बे’ आणि ‘दिल से’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या मनीषाला जेव्हा मनीष तिवारीने नेपाळला जगासमोर आणण्यासाठी एक जागतिक चित्रपट प्रकल्प करावा असे सुचवले तेव्हा मनीषा हसत म्हणाली, ‘तुम्ही आज एक बीज पेरले आहे, ते काय होते ते पाहूया.’ यासोबतच, अभिनेत्री कोइराला महिलांबद्दलही बोलली. मनिषा म्हणाली, ‘कोइराला महिला इतक्या स्वतंत्र आहेत की प्रत्येक मुलगी कोइराला बनू इच्छिते, पण कोणताही पुरूष कोइराला मुलीशी लग्न करू इच्छित नाही!’