baipan bhari deva
प्रदर्शनापासूनच ‘बाईपण भारी देवा’(Baipan Bhari Deva) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले. तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे. (Entertainment)
मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडत आता 76व्या स्वातंत्र्यदिनी ‘बाईपण भारी देवा’ने ही 76.05 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या मराठी चित्रपटाने या कमाईने विजयी झेंडा तर फडकवला आहेच त्याचबरोबर हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
सिनेमाने 76.05 कोटींची कमाई केल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी याविषयी पोस्ट करत म्हटलं आहे की, “भारतमाता की जय… बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली.. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली!! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.”
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते मुंबई पोलिस या सगळ्यांनीच भरभरुन केलेले कौतुक तसेच जगभरातील मायबाप प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादामुळे आज ‘बाईपण भारी देवा’ची यशस्वी घोडदौड अजूनही तितक्याच गतीने सुरू आहे.
आता तर निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकीटावर घट करून फक्त 100 रुपये केल्यामुळे प्रेक्षक नव्या जोमाने पुन्हा पुन्हा जावून चित्रपट बघण्याचा आनंद लुटत आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे.