फोटो सौजन्य - Social Media
२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ कान महोत्सवात सर्वोत्तम ठरलेल्या चायनीज चित्रपट ब्लॅक डॉगने होणार आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला असून अ-सर्टन रिगार्ड विभागात विशेष सन्मानाने गौरवला गेला आहे. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अंधेरी येथील मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात होणार आहे. यावेळी चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रसिद्ध पटकथा लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना एशियन कल्चर विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
६० हून अधिक चित्रपटांची मेजवानी
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ६० हून अधिक देशी-विदेशी चित्रपट दाखवले जातील. १० ते १६ जानेवारीदरम्यान हा महोत्सव मुंबई आणि ठाणे येथे रंगणार आहे. यामध्ये भारतासह चीन, जपान, कोरिया, तैवान यांसारख्या देशांतील चित्रपटांचा समावेश असेल.
आशियाई चित्रपटांचा महोत्सव
फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सांगितले की, हल्ली हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट सहज उपलब्ध होत असल्याने भारतीय प्रेक्षक ते पाहू शकतात. मात्र, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये लोकप्रिय ठरलेले आशियाई चित्रपट भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या चित्रपटांना स्थानिक पातळीवर दाखवण्याचा महोत्सवाचा उद्देश आहे.
महोत्सवात आशियाई संस्कृतीची विविधता दाखवणारे चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर केले जातील. या चित्रपटांमधून आशियाई जीवनशैली, परंपरा, पारंपारिक मूल्ये, कुटुंबातील नाते आणि समाजातील बदल यावर आधारित अनोख्या कथा सांगण्याच्या शैलीचा अनुभव मिळेल. प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना त्या देशाच्या खास जीवनशैलीचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतो, जे भारतीय प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरते. या चित्रपटांमधून एकाच वेळी आशियाच्या भिन्न भागांतील सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पैलू प्रकट होतात, जे प्रेक्षकांना एक नविन दृषटिकोन देतात.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव गेल्या दोन दशकांपासून चित्रपट क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करत आहे. हा महोत्सव फक्त चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता, तर तो सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आशियाई चित्रपट सृष्टीतील विविधतेला प्रोत्साहन देण्याचा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन दिग्दर्शकांना एक वैश्विक व्यासपीठ मिळते, ज्यामुळे त्यांना आपल्या कलेला एक जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवता येते. तसेच, विविध आशियाई देशांतील चित्रपटप्रेमींना या महोत्सवाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक पद्धती आणि कलेचा शोध घेता येतो.