पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर सोनू निगमची जाहीर नाराजी; म्हणाला, “त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही..”
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कांची घोषणा केली. हे पुरस्कार, कला, शिक्षण, विज्ञान आणि साहित्यसह आदी वेगवेगळ्या क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज मंडळींना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आला. याच पद्म पुरस्कारांच्या घोषणेवर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगम याने आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. गायन क्षेत्रातील काही गायकांची नाव घेऊन त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, सोनू निगमने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या पुरस्कारांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. किशोर कुमार, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या गायक-गायिकांना अद्याप पद्म पुरस्कार का दिला गेला नाही, असा सवाल त्याने या व्हिडिओत केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सोनू निगम म्हणतो की, “भारतात असे काही गायक आहेत, की ज्यांनी संपूर्ण जगातील गायकांना प्रेरणा दिलेली आहे. एकाला तर आपण पद्मश्रीवरच संपवलं आहे, ते आहेत मोहम्मद रफी साहेब आणि एक आहेत, ज्यांच्या नशिबी पद्मश्रीसुद्धा नाही. ते म्हणजे किशोर कुमारजी. मरणोत्तर पुरस्कार मिळत आहेत ना? आता जे आहेत त्यापैकी अल्का याज्ञिकजी.. ज्यांचं करिअर इतकं मोठं आणि कमालीचं आहे. त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही. श्रेया घोषालसुद्धा बऱ्याच काळापासून आपल्या कलेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तिलासुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे. सुनिधी चौहानने तिच्या वेगळ्या आवाजाने एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. तिलासुद्धा आतापर्यंत काहीच मिळालं नाही. गायन असो, अभिनय असो किंवा विज्ञान असो.. इतरही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना न्याय मिळाला नाही असं तुम्हाला वाटत असेल तर, त्यांची नावं कमेंट्समध्ये लिहा.”
सोनू निगमने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विविध कलाकारांची नावं लिहिलेली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी, ७ जणांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंह, पंकज उधास (मरणोत्तर) आदी दिग्गजांनाही वेगवेगळे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.