Laadli Media Award 2024 : 'लापता लेडीज' आणि 'ताली' चित्रपटांना मिळाला प्रतिष्ठित पुरस्कार...
लाडली मीडिया आणि जाहिरात पुरस्कार २०२४ मध्ये भारतातील आणि दक्षिण आशियातील ७ देशांतील १४ पत्रकारांसह साहित्य, सिनेमा, जाहिरात, आणि माध्यम क्षेत्रातील ४२ उत्कृष्ट योगदानकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यूएनएफपीएच्या कार्यकारी संचालिका डॉ. नतालिया कानेम आणि प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होत्या.
Gender Sensitivity साठीच्या फिल्म पुरस्कारांमध्ये ‘काथल – द कोअर’, ‘लापता लेडीज’, आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटांचा गौरव करण्यात आला होता. तसेच, लिंगभाव संवेदनशील कथानकासाठी ‘ताली’ या वेब सीरिजलाही गौरविण्यात आले. या पुरस्कारांच्या चौथ्या पर्वात भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, आणि मालदीवमधील कार्याचाही सत्कार करण्यात आला.
पॉप्युलेशन फर्स्टचे माजी सीईओ आणि विश्वस्त डॉ. ए. एल. शारदा यांनी या पुरस्कारांना “साहित्य, जाहिरात, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट निर्मात्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा एक मार्ग” म्हटले. विद्यमान संचालक योगेश पवार म्हणाले, “माझ्या ३० वर्षांच्या पत्रकारितेत मी अनेक उत्तम कामे पाहिली आहेत, पण या पुरस्कारांमुळे मान्यता मिळवणारे कार्य वेगळेच आहे. मला गर्व आहे की मी देशभरातील १० उत्कृष्ट पुरस्कारप्राप्त व्यक्तीं आणि १४ दक्षिण आशियाई पत्रकारांमध्ये समाविष्ट आहे.”
डॉ. अर्माइटी देसाई यांना प्रतिष्ठित लाडली ऑफ द सेंच्युरी पुरस्काराने, तर बाची कर्कारिया यांना लाडली जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हेतल देढिया यांना वूमन बिहाइंड द स्क्रीन पुरस्काराने तर ॲड. वृंदा ग्रोवर यांना लाडली जेंडर चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतात यूएनएफपीएने आपली ५० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने विशेष लाडली पुरस्कार देण्यात आला. यावेळी “मीडिया आपल्याला विचार करण्याची पद्धत आणि महिलांचा आदर कसा करावा हे शिकवते. विविध आवाजांचे समर्थन करून आणि रूढीवादी विचारांना आव्हान देऊन, मीडिया सामाजिक मान्यता बदलू शकते आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देऊ शकते,” असे यूएन उपसचिव आणि यूएनएफपीए कार्यकारी संचालकांनी लाडली मीडिया पुरस्कार २०२४ च्या उद्घाटनात म्हणाल्या. या विजेत्यांमध्ये डॉ. हरजंत गिल, निधी जमवाल, शीलू श्रीनिवासन, परोमिता वोहरा, अनिता गुरुमूर्ती, आणि विशाखा दत्ता यांचा समावेश होता.