(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आपली थोरली बहिण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत, आशा भोसले यांनीही संगीत क्षेत्रात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतर, दोन्ही बहिणींनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली आणि चित्रपटांमध्ये गाण्यासही सुरुवात केली. अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून त्या बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक बनल्या. ही त्यांच्या कारकिर्दीची केवळ एक झलक होती, पण आशा भोसले यांचे आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले. आशा भोसले यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.
लता मंगेशकर यांच्यासोबतचे नाते का बिघडले?
आशा भोसले लता दीदींना आपला आदर्श मानत होत्या. मात्र, लहान वयातच आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांचे मन दुखावले होते. खरे तर, वयाच्या १६ व्या वर्षी आशा भोसले यांनी प्रेमापोटी लता मंगेशकर यांचे सचिव, गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले होते. गणपतराव आशांपेक्षा २० वर्षांनी मोठे होते. हे नाते लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. असे म्हटले जाते की, यामुळे आशा आणि लता मंगेशकर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, जो बराच काळ टिकला.
आशा ताई आणि आर. डी. बर्मन यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध
पहिले लग्न तुटल्यानंतर आशा भोसले यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलले. संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांची भेट एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान झाली. आर. डी. बर्मन यांनीच सर्वप्रथम आशा भोसले यांच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले. ते त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते. आशा भोसले यांनी १९८० मध्ये संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन सोपे नव्हते. आशा भोसले यांना पहिल्या लग्नापासून तीन मुले होती, त्यामुळे आर. डी. बर्मन यांचे कुटुंब त्यांच्या लग्नावर खूश नव्हते. तरीही, आर. डी. बर्मन यांनी हार मानली नाही आणि आशा यांच्याशी लग्न केले. पुढे, त्या दोघांनी एकत्र काही उत्कृष्ट गाणी तयार केली. १९९४ मध्ये आर. डी. बर्मन यांचे निधन झाले आणि आशा भोसले एकट्या पडल्या.
मुलगी आणि मुलाच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला
आशा भोसले यांनी यापूर्वीच आपले पती आर. डी. बर्मन यांना गमावले होते. त्यानंतर, त्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचेही निधन झाले. २०१२ मध्ये आशा भोसले यांची मुलगी वर्षा हिने आत्महत्या केली. चार वर्षांनंतर, २०१५ मध्ये, त्यांचा मुलगा हेमंत याचा कर्करोगाने मृत्यू झाला. दोन मुलांच्या मृत्यूने आशा भोसले पूर्णपणे खचून गेल्या होत्या.
Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी २० हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गायनासोबतच आशा भोसले यांनी अभिनयातही हात आजमावला आहे. २०१३ मध्ये, त्यांनी ‘माई’ या मराठी चित्रपटात काम केले, जिथे त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.






