(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पद्मविभूषण पुरस्कार विजेते आणि प्रख्यात अर्धशास्त्रीय गायक पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील त्यांच्या निवासस्थानी पहाटे ४:३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. ते काही काळापासून आजारी होते आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयुर्विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांची धाकटी मुलगी डॉ. नम्रता मिश्रा यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा मिश्रा यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना पहाटे ४:३० वाजता मृत घोषित केले. या बातमीमुळे आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट
पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे अंत्यसंस्कार कधी आणि कुठे केले जातील?
पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे अंत्यसंस्कार काशी येथे केले जाणार असल्याचे समजले आहे आणि त्यांचे पार्थिव वाराणसीला आणण्याची तयारी सुरू आहे. त्यांचे एकुलते एक पुत्र, तबलावादक पंडित रामकुमार मिश्रा, छन्नुलाल यांचे अंत्यसंस्कार करणार आहेत. त्यांचे अंत्यसंस्कार आज वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर केले जातील.
पंडित छन्नुलाल मिश्रा यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९३६ रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला. त्यांनी सुरुवातीला त्यांचे वडील बद्री प्रसाद मिश्रा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. नंतर छन्नुलाल मिश्रा यांनी उस्ताद अब्दुल गनी खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. ते प्रसिद्ध तबलावादक पंडित अनोखेलाल मिश्रा यांचे जावई देखील होते. तसेच त्यांच्या अचानक जाण्याने आता सगळे शोक व्यक्त करत आहेत, आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
पंतप्रधान मोदींनी छन्नुलाल मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली
प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नुलाल मिश्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शोक व्यक्त केला आणि म्हटले की त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय संगीत परंपरा प्रस्थापित करण्यात अमूल्य योगदान दिले. ट्विटरवर पोस्ट केलेल्या शोक संदेशात त्यांनी लिहिले की, “प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित छन्नुलाल मिश्रा यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी आपले जीवन भारतीय कला आणि संस्कृतीच्या समृद्धीसाठी समर्पित केले. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीत जनतेपर्यंत पोहोचवले नाही तर जागतिक स्तरावर भारतीय परंपरा प्रस्थापित करण्यातही अमूल्य योगदान दिले. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळाले हे माझे भाग्य आहे. २०१४ मध्ये, ते वाराणसी मतदारसंघासाठी माझे प्रस्तावक देखील होते. या दुःखाच्या वेळी, मी त्यांच्या कुटुंब आणि चाहत्यांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”