नफीसा अली यांना पुन्हा एकदा कर्करोगाची लागण (Photo Credit- X)
Nafisa Ali Canser: बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली (Nafisa Ali) यांना पुन्हा एकदा कर्करोगाची लागण झाली आहे. २०१८ मध्ये त्यांना पेरिटोनियल कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यावेळी त्या दर तीन महिन्यांनी तपासणीसाठी जात असे. मात्र, २०१९ मध्ये नफीसा कर्करोगापासून पूर्णपणे बऱ्या झाल्या. पण, आता ६ वर्षांनंतर त्यांना पुन्हा या प्राणघातक आजाराने ग्रासले आहे. अभिनेत्रीने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की त्यांना स्टेज ४ चा कर्करोग आहे.
नफीसा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या मुलांसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे. त्यांनी मुलांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रश्नात त्यांच्या मुलांनी विचारले, “आई, तू नसशील तेव्हा आम्ही कुणाकडे जायचे?” यावर नफीसा यांनी उत्तर दिले, “एकमेकांना आधार द्या. माझ्यासाठी सर्वात मोठी भेट तुम्हीच आहात, तुम्ही भावंडं एकच प्रेम आणि आठवणी एकत्र वाटून घेता. एकमेकांचे रक्षण करा आणि लक्षात ठेवा, तुमचं नातं आयुष्यातील कोणत्याही संकटापेक्षा अधिक मजबूत आहे.”
अभिनेत्री नफीसा अली यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून, त्यांच्या या पोस्टने चाहत्यांना धीर दिला आहे. ‘मला हे जीवन खूप आवडते’ असे कॅप्शनमध्ये लिहित त्यांनी आपल्या तब्येतीची माहिती दिली.
नफीसा अली यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आजपासून माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. काल माझे पीईटी स्कॅन झाले आणि आता मी पुन्हा केमोथेरपीवर परतले आहे, कारण माझी शस्त्रक्रिया आता शक्य नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मला हे जीवन खूप आवडते.” त्यांची ही सकारात्मकता पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नफीसा अली यांनी १९७९ साली ‘जुनून’ या चित्रपटातून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्या दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्यासोबत दिसल्या होत्या. शशी कपूर यांच्या व्यतिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन (मेजर साब), धर्मेंद्र (आंतक) आणि विनोद खन्ना (क्षत्रिय) यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तसेच, त्यांनी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘गुजारिश’, ‘यमला पगला दीवाना’ आणि ‘बेवफा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. १९९६ साली त्यांनी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले होते.