फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Sai Tamhankar Exclusive Interview : आशिष बेंडे दिग्दर्शित ‘मानवत मर्डर’ वेबसीरीज येत्या ४ ऑक्टोबरपासून Sony Live या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून सीरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. सीरीजच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकरबरोबर नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने आपल्या भूमिकेबद्दल दिलखुलास चर्चासुद्धा केली. सईने ‘मानवत मर्डर’ सीरीजमध्ये समिंद्री नावाचे पात्र साकारले आहे.
हे देखील वाचा – ‘मला काहीतरी सांगायचंय’; शिंदे-ठाकरेंची लढाई आता रंगमंचावर, राजकारण तापणार
कशी आहे सईने साकारलेली समिंद्री
यावेळी सईला सीरीजमध्ये तू साकारत असलेल्या भूमिकेत वेगळेपणा काय आहे? तुझ्या वाट्याला ही भूमिका कशी आली ? असा प्रश्न विचारला असता सईने अगदी मनमोकळेपणाने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले, “मी कायमच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते. मला साचेबद्ध काम करायला आवडत नाही. ‘मानवत मर्डर’सीरीजमध्ये मी समिंद्री हे पात्र साकारत आहे. आतापर्यंत साकारत आलेल्या भूमिकेतील सगळ्यात वेगळं असं हे माझं पात्र आहे. मला नेहमीच हटके भूमिका साकारायला आवडतात. या भूमिकेत विशेषतः मला वेगळेपणा जाणवल्यामुळे लगेचच मी भूमिकेसाठी होकार दिला.”
अनोख्या भाषेच्या प्रेमात
“समिंद्री पात्राची भाषा अनोखी असल्यामुळे मी या कॅरेक्टरसाठी होकार दर्शवला. माझी ही भूमिका इतर भूमिकांपेक्षा फार वेगळी आहे. त्यामुळे मला काम करताना खरोखरंच फार मज्जा आली. त्यासोबतच हा लुकसुद्धा माझ्यासाठी फार वेगळा होता. त्यासाठी माझ्या मेकअप टीमनेही खास मेहनत घेतली आहे. इतकंच नाही तर माझ्या लुकमधील नाविन्यपणाही मला दाखवून दिला आहे. सीरीजमध्ये काम करताना मला खूप मज्जा आली. विशेष म्हणजे शिकायलाही बरंच काही मिळालं.”
हे देखील वाचा – नव्या चार्टबस्टरसाठी रॉकस्टार डीएसपी अन् शिल्पा राव एकत्र? जाणून घ्या सविस्तर!
काय आहे कथा?
जादूटोणा, खून आणि रहस्य अशी कथा असलेल्या ह्या सीरीजची कथा मानवत गावातील आहे. १९७२ साली मानवत गावात दीड वर्षांत सात जणांचा खून झालेला असतो. या मर्डर मिस्ट्रीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका खूनाचा शोध या सीरीजमधून घेण्यात येणार आहे. सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टारकास्ट या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे, सीरीजमध्ये प्रेक्षकांना मराठमोळ्या कलाकारांचा केव्हाही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे. सीरीजचं दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केलं असून सीरीजची निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी केली आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत पाहायला मिळणार आहे.