फोटो सौजन्य - Social Media
भारतीय टेलिव्हिजनवरील एकेकाळची लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ने आपल्या दुसऱ्या सीझनसह 29 जुलै रोजी स्टार प्लसवर दमदार पुनरागमन केले असून, सुरुवातीच्या आठवड्यातच या मालिकेने इतिहास घडवला आहे. मालिका पाहण्याचा Watch Time तब्बल 1.659 बिलियन मिनिटांवर पोहोचत भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात मोठ्या फिक्शन लॉन्चपैकी एक म्हणून नोंदवला गेला आहे.
या जबरदस्त पुनरागमनामुळे प्रेक्षकांच्या आठवणी जाग्या झाल्या असून, नव्या पिढीतील दर्शकही या कथानकाकडे आकृष्ट झाले आहेत. केवळ पहिल्या चार दिवसांत मालिकेने 31.3 मिलियन टीव्ही प्रेक्षक मिळवले, तर स्टार प्लसवरील पहिल्या भागालाच 15.4 मिलियन प्रेक्षकांनी डोळे लावले. यासोबतच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर मालिका लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे पारंपरिक टीव्ही आणि डिजिटल माध्यम यांची यशस्वी सांगड घालण्यात मालिकेला यश मिळाले.
‘जिओस्टार’ चे हेड ऑफ क्लस्टर सुमंतो बोस यांनी सांगितले की, “‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ च्या पुनरागमनाने हे सिद्ध केले आहे की, उत्कृष्ट कहाणीची ताकद कधीच ओसरत नाही. ही मालिका लॉन्च करण्यामागे आमचा दुहेरी दृष्टिकोन होता: भारतातील एका अत्यंत गाजलेल्या मालिकेची जादू, त्या आठवणी पुन्हा जाग्या करायच्या आणि तसे करताना आजच्या प्रेक्षकांना भावेल, त्यांना उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभव देईल असे कथानक गुंफायचे. स्टार प्लसवरील विक्रमी आकडे वेधक कथानकांच्या कालातीत अकर्षणावरील आमचा विश्वास अधिक दृढ करणारे आहेत. या मालिकेचे पुनरागमन हा दोन पिढ्यांना जोडणारा एक सांस्कृतिक क्षण आहे. आणि असा क्षण आम्ही या प्लॅटफॉर्मवर असलेल्या लक्षावधी घरांपर्यंत पोहोचवल्याचा अभिमान आम्हाला वाटत आहे.”
सामाजिक माध्यमांवर देखील या मालिकेचा प्रभाव दिसून आला आहे. ऑनलाइन 17,300 हून अधिक वेळा या मालिकेचा उल्लेख झाला असून त्यातील 86% प्रतिक्रिया सकारात्मक होत्या, त्यामध्ये भावनिक गुंतवणूक, कलाकारांचं कौतुक आणि कथानकाबद्दलचा उत्साह यांचा समावेश होता.
या मालिकेने फक्त टीव्ही मालिका म्हणूनच नव्हे, तर एका सांस्कृतिक आणि डिजिटल घडामोडी म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना एकत्र आणून, सहभागी करून घेण्याची क्षमता काल्पनिक कंटेंटमध्ये किती आहे, हे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ च्या यशाने अधोरेखित केले आहे.