
फोटो सौजन्य - Social Media
थायलंडमध्ये सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यान मंगळवारी मोठा वाद उफाळला. मिस युनिव्हर्स थायलंडचे डायरेक्टर नवात इसाराग्रिसिल यांनी मंचावर सर्वांसमोर मिस मेक्सिको फातिमा बोश यांना “मूर्ख” म्हणत अपमानित केले. हा विषय फार जोरात असून याची जगभरात चर्चा होत आहे.
या घटनेचा तीव्र विरोध करत अनेक देशांच्या स्पर्धकांनी हॉलमधून बाहेर पडून आंदोलन केले. नवात यांनी फातिमावर स्पर्धेच्या प्रमोशनल कंटेंट शेअर न केल्याचा आरोप केला. फातिमाने विरोध केल्यावर त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावण्याची धमकी दिली आणि समर्थन करणाऱ्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्याची चेतावणी दिली. धमकीला पाहत आणि ज्याप्रकारे फातिमाशी वागणूक केली गेली आहे ते पाहता इतर देशातील स्पर्धकही फार चिडले आहेत आणि त्या वर्तणुकीविरोधात स्पर्धकांनी हॉलच्या बाहेर जोरात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या वर्तनावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. शेवटी नवात यांनी माफी मागणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला, मात्र मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने त्यांच्या वर्तनाला “अपमानास्पद आणि दुर्भावनायुक्त” म्हणत तीव्र शब्दांत निंदा केली. संस्थेचे अध्यक्ष राउल रोचा यांनी नवात यांच्या भूमिकेवर मर्यादा आणण्याची आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. घटनेनंतर विद्यमान मिस युनिव्हर्स डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया किएर थेलविग यांनीही हॉलमधून बाहेर पडून महिला सन्मानाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. फातिमा बोश म्हणाल्या, “मी इथे फक्त सौंदर्य दाखवण्यासाठी नाही, तर जगभरातील महिलांच्या आवाजासाठी उभी आहे.”
मिस युनिव्हर्स ही जगातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा असून तिची सुरुवात 1952 मध्ये झाली. दरवर्षी 80 ते 90 देशांतील प्रतिभावान तरुणी यात सहभागी होतात. या स्पर्धेत केवळ सौंदर्य नाही, तर महिलांच्या विचारशक्ती, आत्मविश्वास आणि सामाजिक दृष्टिकोनाचीही कसोटी घेतली जाते.