मुंबई: सिनेजगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यासोबत एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलीय. मुंबईतील चेंबूरमध्ये ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सोनू निगम सारख्या बड्या आणि नामांकीत गायकासोबत कुणी धक्काबुक्की केली असेल? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. यादरम्यान एका आमदाराच्या मुलाचा सोनू निगमच्या अंगरक्षकाशी वाद झाल्याची माहिती समोर येतेय. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सेल्फीस नकार दिल्यामुळं या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले.
गुन्हा दाखल…
सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील चेंबूर भागात लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाली आहे. सोनू निगमसोबत सेल्फी काढण्याच्या नादात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने मारहाण केली. या घटनेनंतर सोनू निगमने सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून आमदारांच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण कुणी सेल्फी घेण्यासाठी अशी जोरजबरदस्ती करु नये, हा प्रकार निषेधार्थ असून, तिथे काही लोखंडी रॉड पडले असते तर रब्बानी यांचा मृत्यू झाला असता. तिला अशाप्रकारे ढकलले गेले असल्याचं गायक सोनू निगमने म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
चेंबूर फेस्टिव्हलच्या फिनालेदरम्यान ही घटना घडली. सोनू निगम गायन करत होते. त्यानंतर सेल्फीवरुन वाद झाला. आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने आधी सोनूच्या मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने आधी गायकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की केली आणि नंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील फातर्पेकर असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे.