ole ole
आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत. यासाठी मराठी चित्रपटसृष्टी प्रसिद्ध आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी ‘ओले आले’(Ole Ole) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात नाना पाटेकर(Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. (Marathi Movie)
कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ ही ओळ आणखी कुतूहल निर्माण करणारी आहे. हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय बरं असेल? असे बरेच प्रश्न उत्सुकता निर्माण करत आहेत.
रश्मिन मजीठिया निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. “मराठी सिनेरसिकांची आवड निवड लक्षात घेऊन आम्ही ‘ओले आले’ हा चित्रपट बनवला आहे. यात जी प्रवासाची धम्माल गोष्ट आहे, ती प्रत्येकाला नक्कीच जवळची वाटेल. ही सहल प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी असेल”, असा विश्वास कोकोनट मोशन पिक्चर्सचे संस्थापक रश्मिन मजीठिया यांनी व्यक्त केला.
‘ओले आले’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.