फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल नेहा धुपिया तिच्या ठाम आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या आयुष्यातील एक वैयक्तिक आणि चर्चेत राहिलेला प्रसंग उघडकीस आणला. लग्नाआधी ती गरोदर राहिल्याचे तिने कबूल केले असून, त्या काळात तिला समाजाकडून प्रचंड टीका आणि प्रश्नांचा सामना करावा लागल्याचेही सांगितले.
२०१८ साली नेहाने अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केले. विवाहानंतर केवळ सहा महिन्यांतच त्यांच्या पहिल्या मुली मेहरचा जन्म झाला. या कारणामुळे त्यावेळी सोशल मीडियावर आणि जनतेत मोठी चर्चा रंगली. “लग्नानंतर इतक्या कमी कालावधीत मूल कसे झाले?” असा सवाल तिला सतत विचारला जात होता. या संदर्भात प्रतिक्रिया देताना नेहा म्हणाली, “लग्नाआधी गरोदर राहणारी मी पहिली स्त्री नाहीये. आलिया भट्ट आणि नीना गुप्ता यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती घडली होती. मात्र समाजाने नेहमीच अशा गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून पाहिले, जे चुकीचे आहे.”
नेहा पुढे म्हणाली की, मातृत्व ही अत्यंत सुंदर भावना आहे आणि त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. “गर्भधारणा, मातृत्व आणि त्यानंतरचा प्रवास याविषयी समाजात अधिक खुल्या पद्धतीने बोलणे आवश्यक आहे. जर या विषयावर बोलल्यामुळे माझ्यावर टीका होणार असेल, तरी मी बोलणे थांबवणार नाही. कारण या गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे,” असे ती म्हणाली.
सध्या नेहा आणि अंगद बेदी यांना दोन मुले आहेत. ७ वर्षांची मुलगी मेहर आणि ३ वर्षांचा मुलगा! कौटुंबिक आयुष्य सांभाळत ती करिअरमध्येही सक्रिय आहे. मॉडेल म्हणून सुरुवात केल्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. तसेच तिने दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले असून, लवकरच ती एका नव्या वेब सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
नेहाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महिलांविषयी समाजात असलेल्या दुटप्पी दृष्टीकोनावर चर्चा सुरू झाली आहे. लग्नाआधी गरोदर राहिलेल्या स्त्रियांवर अजूनही टीका केली जाते, हे तिने स्पष्टपणे अधोरेखित केले. मात्र तिच्या धाडसी भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले असून, मातृत्वासंदर्भात अधिक मोकळ्या चर्चेची गरज असल्याचे मत पुढे येत आहे.