
shriya pilgaonkar in australia
मराठी अभिनेत्री आणि उगवती ओटीटी स्टार श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) अलीकडेच ऑस्ट्रेलियातील (Australia) आपल्या दहा दिवसांच्या सहलीवरून परतली आहे. या ट्रिपमुळे श्रिया बालपणीच्या आठवणीत रममाण झाली. आपल्या आजोबांबरोबर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सहलीची आठवण श्रिया जागवते. ऑस्ट्रेलियाचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती, तिथली मनावर गारुड करणारा भूप्रदेश आणि टोपोग्राफी, वन्यजीवनाचा अनोखा अनुभव आणि विविधतेने नटलेली खाद्यसंस्कृती यांनी ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा भेट देण्याची, आणि आपले आवडते क्षण पुन्हा अनुभवण्याची इच्छा श्रियाच्या मनात जागी झाली.
“मी मागच्या वेळेला ऑस्ट्रेलियाला गेले होते, तेव्हा मी शाळेत शिकत होते. मी माझ्या आजोबांसोबत तो प्रवास केला आणि तिथे माझा वेळ अगदी मस्त गेल्याचं मला आठवतं. आपण ऑस्ट्रेलियाला पुन्हा जायला हवं हे मला मनातल्या मनात माहीतच होतं.” श्रिया म्हणाली.
“पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला भेट द्यायला मी खूपच उत्सुक होते, विशिषत: सप्टेंबर महिन्यात कारण या काळात तिथलं हवामान सहलीसाठी अगदी साजेसं असते.” श्रिया सांगते. न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन राज्यांमधील तिच्या प्रवासाच्या वेळापत्रकातील ४ महत्त्वाचे अनुभव श्रिया सांगते आणि यासाठी टुरिझम ऑस्ट्रेलियाचे आभारही मानते.
आपल्या पुढच्या सहलीमध्ये ऑस्ट्रेलियाचा आणखी काही भाग धुंडाळण्याची श्रियाची इच्छा आहे. “एक सहल पुरेशी नाही. पुढच्या भेटीत मला ऑस्ट्रेलियाच्या खोल अंतरंगात नीट शिरून तिचा शोध घ्यायचा आहे. रस्त्यावरून ऑस्ट्रेलियाची सैर करणे हा एक विलक्षण अनुभव असेल. जिथे मी पूर्वी कधीही गेलेले नाही, अशा तिथल्या उलुरू आणि टाझ्मेनियासारख्या ठिकाणांना भेट द्यायला आणि ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक इतिहासाविषयी व तिथल्या मूलनिवासींच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यायला आवडेल. कदाचित ग्रेट बॅरीयर रिफवर स्कुबा डायव्हिंगही करायला आवडेल.” असं तिने सांगितलं.
श्रिया नव्या ऑन-स्क्रिन प्रोजेक्टसबद्दल म्हणाली, “मी इश्क ए नादान नावाच्या एका रॉमकॉम फिल्ममध्ये काम करते आहे आणि त्याखेरीज आणखी दोन चित्रपट निर्मितीच्या प्रतीक्षेत आहेत. गिल्टी माइन्ड्स आणि द ब्रोकन न्यूजचा सीझऩ २ सुद्धा येत्या काळात प्रसारित होणार आहे.”