colors marathi sur nava dhyas nava
‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) हा कलर्स मराठीवरील (Colors Marathi) कार्यक्रम ‘पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे’ हे ब्रीद समोर ठेवून आपलं पाचवं पर्व घेऊन अवतरत आहे. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल १६ स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.
[read_also content=”शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट https://www.navarashtra.com/india/shivsenas-12-mps-meeting-with-chief-minister-eknath-shinde-nrsr-305936.html”]
मराठी संगीत क्षितिजावरचे उगवते सुरेल १६ गायक सुरांची आतषबाजी करणार आहेत. दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे’ या कार्यक्रमाचे ग्रँड प्रीमियर येत्या रविवारी २४ जुलैला संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. फक्त परीक्षकाच्या भूमिकेतून नाही तर निर्मात्याच्या भूमिकेतून कार्यक्रमाला लोकप्रिय करण्यासाठी जीव ओतणारे महाराष्ट्राचे जोशिले रॅाकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते तसंच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा नि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे ही या कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची बलस्थाने आहेत. या दोन अनुभवी परीक्षकांच्या कलात्मक छिन्नीतून आकार घेत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या मंचावर आजवर अनेक सुरेल गायक घडले आहेत.
याच दर्जेदार कार्यक्रमाच्या मंचावरून अनिरूद्ध जोशी, स्वराली जाधव, अक्षया अय्यर , सन्मिता शिंदे यांसारखे गुणी गायक मानाच्या सुवर्णकट्यारीचे मानकरी ठरले आहेत. तर अनिरूध्द जोशी, शरयू दाते, चैतन्य देवढे, रवींद्र खोमणे, संपदा माने, राधा खुडे हे पार्श्वगायक मराठी चित्रपट आणि मालिकांना लाभले आहेत. हे केवळ सूर नवा ध्यास नवा च्या मंचावरच घडू शकते, ही या मंचाची जादू आहे.
या कार्यक्रमाची संवेदनशील गुणी अभिनेत्री आणि कवी मनाची अभ्यासू सूत्रधार स्पृहा जोशी; भाषेवर प्रभुत्व असलेली चिंतनशील कवी, चित्रपट गीतकार आणि कार्यक्रमाचे लेखक वैभव जोशी; संगीताची प्रगल्भ जाण असलेले संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि सूर नवाच्या मंचावर अद्भुत स्वरमंडल निर्माण करणारा ताकदीचा कुशल वाद्यवृंद ही तर या मंचाची खास ओळख आहे. तर ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे पट्टशिष्य आणि दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटसम्राट, डॅाक्टर काशिनाथ घाणेकर सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे संगीतकार अजित परब हे सूर नवा च्या या पर्वाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. अशा संगीतक्षेत्रातील अनुभवसंपन्न टीमला एकत्र बांधून ‘सूर नवा ध्यास नवा’ या अस्सल नि अव्वल कार्यक्रमाची निर्मिती एकविरा प्रॅाडक्शन्स करत असून गिरीजा गुप्ते या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत.
या कार्यक्रमाबद्दल आपली भूमिका मांडताना अवधूत गुप्ते म्हणाले की, “सूर नवा मध्ये तळागाळातला आवाज वर आणण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सूर नवा च्या प्रत्येक पर्वात काही आगळं वेगळं देण्याचा नि ते ते पर्व अधिकाधिक बहारदार करण्याचा आंम्हा सर्वांचा अट्टाहास असतो. निर्माता आणि परीक्षक अशी दुहेरी जबाबदारी पेलताना हे पर्वसुध्दा तितकंच लखलखतं देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्याच हेतूने दर आठवड्याला एक नवं आश्चर्य रसिकांसमोर ठेवण्याचे आपण ठरवले आहे.”
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मुले आपापल्या मातीचा सुवास घेऊन , त्या प्रांताची खासियत घेऊन इथे येतात. त्यामुळे शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, भक्तीसंगीत या महाराष्ट्रातल्या संगीताच्या ज्या विविध धारा आहेत, त्या इथे अनुभवता येतात. मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असलो तरी त्या स्पर्धेचं परीक्षण करताना एरवी माझ्या यादीत येणार नाहीत ती नवी गाणी ऐकून , नवी ऊर्जा घेऊन मी समृ्दध होतो, त्यातून बरंच काही शिकतोय! “ असं महेश काळे यांनी या स्पर्धेबद्दल बोलताना सांगितलं.