महान स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची आज १३९वी जयंती आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात सावरकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याच जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. याप्रसंगी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकरांची दमदार व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणदीप हुडाचा फर्स्ट लूक (Randeep Hooda) रिलीज केला आहे. रिलीज झाल्याच्या काहीच तासांत या लूकला चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
अभिनेता रणदीप हुडा चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ अशी टॅगलाईन लिहिली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकांना या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.
या खास प्रसंगी बोलताना चित्रपट निर्माते संदीप सिंग यांनी म्हटलं, “जेव्हा हर्षद मेहता, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंडमध्ये असताना मला वीर सावरकरांच्या जीवनाची कथा सांगण्यात जास्त रस वाटला कारण ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते. आणि १९४७ मधील फाळणी वाचवू शकलेले एकमेव पुरुष होते. या चित्रपटाद्वारे मला, केवळ एक चित्रपट निर्माता म्हणून नव्हे, तर एक भारतीय म्हणून, सावरकरांच्या संघर्षाची वस्तुस्थिती जगाला सांगायची आहे. स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा धाडसी लढा, इंग्रजांना घाबरवणारे त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे. सर्वांनी गैरसमज करून घेतलेल्या या हिरोला आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना कधीच मिळालं नाही आणि म्हणूनच सावरकरांना भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक दिलं जावं अस मी निवेदन करतो.”
निर्माते आनंद पंडित यांनी म्हटलं की, “रणदीपने एक अभिनेता म्हणून आपले कौशल्य वारंवार दाखवले आहे आणि शिवाय, त्याने साकारलेल्या पात्रात तो स्वतःला बदलू शकतो हे दाखवून दिले आहे. परंतु सावरकरांच्या बाबतीत, स्वातंत्र्यसैनिकांसोबत त्यांच्या विलक्षण साम्यामुळे आणखी एक उमेद मिळाली आहे. मी इतिहास प्रेमी आहे आणि ज्या नेत्याची कथा सांगायलाच हवी, त्यांची कथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सिनेमॅटिक विशेषाधिकार मिळाल्याबद्दल मी उत्सुक आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात, “लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळ्या आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही.
तसेच अभिनेता रणदीप हुड्डाने यावेळी म्हटलं, “भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एक असणाऱ्या या नायकाला माझा सलाम आहे. मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्यांची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन.”आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रस्तुत केले जात असून निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.