फोटो सौजन्य - Social Media
अमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया आणि झी म्युझिकने सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी निशानची चित्रपटातील हृदयाला भिडणारं रोमँटिक गाणं ‘नींद भी तेरी’ प्रदर्शित केलं आहे. या गाण्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या निशानची चित्रपटाचे निर्माते अजय राय आणि रंजन सिंग असून दिग्दर्शनाची धुरा स्वतः अनुराग कश्यप यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातून अभिनेता ऐश्वर्य ठाकरे आपल्या अभिनय कारकिर्दीची दमदार सुरुवात करत आहेत. विशेष म्हणजे, ते या चित्रपटात डबल रोल साकारत आहेत. त्यांच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
‘नींद भी तेरी’ हे गाणं मनन भारद्वाज यांनी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि स्वतः गायलं आहे. त्यांच्या अनोख्या शैलीमुळे हे गाणं शांतता, प्रेम आणि भावनांच्या खोलवर नेणारं ठरतं. प्रेमातील नाजूक भावना, नात्यांमधील सूक्ष्म बदल आणि हृदयातील अनकथ शब्द हे गाणं सुरेखपणे प्रकट करतं. या गाण्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटासाठी याचं दुसरं व्हर्जनही तयार करण्यात आलं आहे. हे व्हर्जन स्वतः ऐश्वर्य ठाकरे यांनी गायलं असून, त्यांच्या अभिनयासोबत गायनाचं कौशल्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
गाण्याच्या माध्यमातून चित्रपटात एक लव्ह ट्रायंगल अधोरेखित होतं. मधुर धून, सुंदर शब्द आणि भावनिक सादरीकरणामुळे हे गाणं श्रोत्यांच्या मनात खोलवर घर करतं. मनन भारद्वाज यांनी भारतीय संगीताचा आत्मा जपत त्याला आधुनिक स्पर्श दिला असून त्यामुळे गाणं ऐकणाऱ्याला सहज भिडतं. संगीतकार मनन भारद्वाज यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, “नींद भी तेरी हे गाणं शब्दांच्या पलीकडे जाऊन शांतता, तडफड आणि संकोच व्यक्त करतं. यामध्येच निशानचीचा खरा आत्मा दडलेला आहे. मी स्वतः हे गाणं गाऊन त्या भावनांचा प्रामाणिकपणे अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”
निशानची चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. ही कथा दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित आहे. त्यांच्या वेगळ्या मार्गांच्या निवडी त्यांचं भविष्य ठरवतात आणि याच संघर्षात एक रोमांचक सिनेमॅटिक प्रवास घडतो.
हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यप यांच्या अनोख्या दिग्दर्शनामुळे आणि ‘नींद भी तेरी’सारख्या गाण्यांमुळे निशानची प्रेक्षकांना एक अफलातून अनुभव देण्यास सज्ज आहे.