
ved and pathaan
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसूजा (Genelia) यांच्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वादळाच्या वेगासारखी कमाई करणारा शाहरुख खानचा ‘पठाण’(Pathaan) चित्रपटदेखील ‘वेड’च्या कमाईला ब्रेक लावू शकला नाही. दोन्ही चित्रपटाचं बजेट आणि त्या तुलनेत दोन्ही चित्रपटांना झालेला नफा या बाबतीतले आकडे बघितले तर ‘वेड’ आघाडीवर आहे.
गेल्या आठवड्यात ‘वेड’चित्रपटाने 1.20 कोटींची कमाई केली. सोमवारीही चित्रपटाचं कलेक्शन चांगलं होतं. भारतात या चित्रपटाने 58.25 कोटी कमावले आहेच. चित्रपटाचे शो अजुनही हाऊसफुल आहेत.रितेश देशमुखने सोमवारी 31 दिवसांमधल्या कलेक्शनची माहिती सोशल मीडियाद्वारे जाहीर केली. चित्रपटाचं नेट आणि ग्रॉस कलेक्शन त्याने जाहीर केलं.
भारतात चित्रपटाचं नेट कलेक्शन रविवारनंतर साधारण 58.11 कोटी आणि ग्रॉस कलेक्शन 70.99 कोटी होतं. रितेशने त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
बजेट आणि नफा – ‘पठाण’ आणि ‘वेड’ची तुलना
‘वेड’ चित्रपटाचं बजेट साधारण 15 कोटी होतं आणि भारतातलं या चित्रपटाचं नेट कलेक्शन साधारण 58.25 कोटी आहे. याचाच अर्थ चित्रपट 288 टक्के प्रॉफिटमध्ये आहे. नफ्याच्या बाबतीत ‘वेड’ पठाणच्या पुढे आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण सिनेमाचं बजेट 250 कोटी आहे. भारतातलं या चित्रपटाचं नेट कलेक्शन 296.50 कोटी आहे. या हिशेबाने चित्रपट फक्त 18 टक्के नफा कमवू शकला आहे.
‘सैराट’नंतर कमाईत दुसरा नंबर
‘सैराट’नंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ‘वेड’चा दुसरा नंबर लागतो. ‘सैराट’ने साधारण 110 कोटींची कमाई केली होती. सैराट हा नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेला सिनेमा असून यात रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘वेड’ चित्रपटामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांच्यासह जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, खुशी हजारे, रवीराज केंडे, विनीत शर्मा, विक्रम गायकवाड, अविनाश खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रितेश-जिनीलिया हे कपल केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही चाहत्यांचं फेव्हरेट आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना एकत्र पाहणं सगळ्यांना आवडतं. ‘वेड’ चित्रपटामुळे मराठी सिनेसृष्टीत एक सकारात्मक वातावरण तयार झाले. आता या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम केला आहे. ‘वेड’ 100 कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवेल का ? हा प्रश्न आता रितेश आणि जिनिलिया देशमुखच्या चाहत्यांना पडला आहे.