
मॅनेजर उद्धट वागल्यामुळे मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा
‘द ताश्कंत फाईल्स’, ‘द काश्मिर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. कायमच आपल्या दमदार कथानकामुळे चर्चेत राहणारे विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या मॅनेजरच्या उद्धट वागणूकीमुळे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. मॅनेजर घमंडी असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत (विवेक अग्निहोत्री) गैरवर्तवणूक केल्यामुळे त्यांनी मुख्य अभिनेत्याला आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे.
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी इंडस्ट्रीतील कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांचे मॅनेजर्स यांच्यावर टीका केली होती. मुकेश छाब्रा यांच्या त्याच पोस्टवर रिॲक्ट होत विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातून एका बड्या अभिनेत्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं.
मुकेश छाब्रा यांनी लिहिलंय की, “फिल्म इंडस्ट्रीतील सध्याची परिस्थिती, एक अभिनेता, २०० कास्टिंग डायरेक्टर आणि १५,६८० मॅनेजर, अशी आहे.”
याच पोस्टवर प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री म्हणतात, “मला गेल्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकावं लागलं, कारण त्याचा मॅनेजर खूप उद्धट वागत होता. तो एका बड्या सेलिब्रिटीच्या स्टार किडच्या टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी असल्यामुळे त्याला असं वागण्याचा विशेष अधिकार आहे, असं त्याला वाटत होतं. यांसारख्या अनेक मॅनेजर्सने मुलांचे करियर घडवायचे सोडून उद्ध्वस्त केले आहेत. मुकेश, कृपया या सर्व जणांचं वर्कशॉप घेऊन यांना सर्व गोष्टी पुन्हा शिकव.”
I had to fire a lead actor last week because his manager was so arrogant and behaved as if he had the prerogative to be like this just because he is an employee of a ‘Huge Celeb’s’ Star Kid Talent Agency’. These middlemen have destroyed more careers than made it. Do a workshop… https://t.co/r3RtDtyBBu — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 27, 2024
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये त्या कलाकाराचं नाव स्पष्ट केलेलं नाही. विवेक अग्निहोत्री सध्या ‘द दिल्ली फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘पर्व’ नावाचा आणखी एक चित्रपट येणार आहे. ह्या चित्रपटाचं कथानक ‘पर्व’ नावाच्याच कन्नड पुस्तकावर आधारित असेल.