अखिल जगताचा मनभावन रंग… सगळ्यात जास्त आवडता रंग… वर पसरलेले विस्तीर्ण आकाश आणि ७१ टक्के पाण्याने व्यापलेल्या भूमीचा रंग… मनाला आणि शरीराला शीतल करणारी निसर्गाने केलेली ही उधळण म्हणजेच निळा रंग…
निळा रंग म्हणजे उत्तम संवाद, विचारांची देवाण-घेवाण… मनमोकळेपणा… विचारांमध्ये-बोलण्यामध्ये सुसूत्रता… म्हणूनच या रंगाची टॅगलाईन आहे ‘आय स्पीक, आय अॅम हर्ड’… विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत फक्त पोहोचणे नाही तर समजणे देखील..
प्रामाणिकपणा, विश्वासाहर्ता, आदर्शता याचे हा रंग प्रतीक आहे. या गुणांमुळेच शेअर बाजारात, किमती आणि खात्रीशीर शेअर्सना ‘ब्लू चिप’ शेअर्स म्हणतात. पाश्चिमात्य संस्कृतीत ब्लू ब्लड म्हणजे खानदानी, थोर परंपरा जपणारा वारस…
पिंक फॉर गर्ल्स अँड ब्ल्यू फॉर बॉईज… असं म्हणतात. पण, फक्त मुलांनाच नाही तर मुलींवरदेखील निळ्या रंगछटेचे कपडे अधिक खुलून दिसतात. या रंगाची एक मानसिकता अशी आहे की हा रंग तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मकरित्या लोकांसमोर आणत असतात.
एका रिसर्चच्या म्हणण्यानुसार मुलाखतीला जाताना किंवा आपल्या क्लाएंटला भेटायला जाताना निळ्या रंगसंगतीचे कपडे घालावे. हा रंग तुम्ही खूपच प्रामाणिक आणि खरे आहात असे दर्शवतो. अशा रंगामुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वास तुम्ही संपादन करता.
निळ्या रंगाच्या काही छटा खूप प्रभावी असतात. स्वच्छ आकाशाचा हा रंग असून दैवी शक्तीच्या पाठबळाचे प्रतीक आहे आणि हा कान्हाचाही रंग…
निळ्या रंगाला आध्यात्मिक वैभव लाभले आहे…. जे जे विशाल आणि आपल्या समजाच्या, जाणिवांच्या पलिकडचे आहे त्याचा रंग निळा. मग ते अथांग आकाश असेल किंवा अथांग सागर… अथवा तो अनादी अनंत परमेश… त्याचाही रंग निळाच… सर्वांना आपलं म्हणणारा, सामावून घेणारा… एखाद्या मातृ हृदयासारखा… म्हणून तर संत परंपरेत विठ्ठलाला माऊली म्हणतात…
निळा रंग मला आद्य परमेशाचा, मातेचा वाटतो… समस्त मातांचा हा रंग… मनमोहक, समुपदेशक, मनात अथांग प्रेमाचा ठेवा… इथे माता म्हणजे केवळ जीवशात्रीय माता अभिप्रेत नाही तर मातृभाव…. मग तो कदाचित एखाद्या पुरुषाच्या हृदयातही सापडेल…
अशा या सगळ्या माता ज्यांच्या हृदयातील प्रेमाचा ठाव घेण अशक्य… मग ती काळ्या रात्रीत उभा कडा उतरुन जाणारी हिरकणी असेल वा “Not Without My Daughter” म्हणणारी बेटी मोहम्मदी असेल.
आपल्या कच्याबच्यांना दोन घास पोटाला मिळावेत म्हणून उन्हातान्हात शेतात राबणारी माय असो अथवा आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लोकलच्या डब्यात आपले निम्मे आयुष्य घालवणारी आजची आधुनिक माता असो… सर्व मातांना समर्पित असा हा श्यामवर्णी रंग आहे.
– रश्मी पांढरे
९८८१३७५०७६