श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय रंग… कृष्णाने नेसलेलं पितांबर… पिवळं रेशमी वस्त्र… सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जाणारा हा पिवळा रंग.
वैष्णव मंदिरातून वसंत पंचमीनंतर देवांना उन्हाळा संपेपर्यंत पिवळी वस्त्रं नेसवण्याची प्रथा आहे. देवांना पिवळं गंध लावतात आणि पिवळी फुलं वाहतात. पिवळा रंग हा मंगलकार्यात शुभ मानला आहे. शुभकार्यात हळदकुंकू अनिवार्य असते.
महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची प्रिय वस्तू भंडारा. ती देवभक्तांवर उधळली जाते. वधूची अष्टपुत्री साडी पिवळ्या रंगाची असते. वधूवरांच्या विवाह कंकणात हळकुंड बांधतात. लग्नागोदर वधुवरांना हळद लावणं आणि हळद खेळणं हा आपल्याकडे एक गोड सोहळा असतो… असा हा पिवळा रंग, वलयाचा, प्रकाशाचा, सळसळत्या उत्साहाचा… प्रत्येक स्त्रीमध्ये तेवणाऱ्या आदिशक्तीच्या तेजाचा….अशा अनेक तेजस्वी, कणखर स्त्रियांचा…
पण याचं तेजोमय ज्योतीलाही कधीतरी काजळी धरू शकते ही गोष्ट आपण लक्षात घेतो का? हे तेजोवलय तीला खरचं हव आहे का? याचा विचार कधी होतो का? इथे तेजोवलय म्हंटलय म्हणून हा विषय, अगदी थोर स्त्रियांपुरताचं आहे असं नाही तर अगदी आपापल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना हे लागू आहे…
आपल्या ओळखीत एखादी कणखर, स्वतंत्र विचाराची स्त्री असेल तर आठवून बघा… तिने नेहमीचं कणखर असणं अपेक्षित असतं आणि यात फारसं काही चुकीचं आहे असं ही नाही. पण, एखाद्या वेळी तिला काही मदतीची गरज वाटत असेल, मग ती गरज actual physical help ची असेल किंवा विचारांची, शाब्दिक किंवा सहवासाची असेल. आपला आत्मविश्वास काही कारणाने कमी पडतोय असं तिला वाटतं असेल आणि तिने जर कोणाकडून तशी अपेक्षा केली तर दुर्दैवाने तिला बहुतांश वेळा अपेक्षाभंगालाचं सामोरं जावं लागतं.
या स्त्रियांचा प्रॉब्लेम असा की आयुष्यात कोणाकडे मनमोकळेपणाने बोलायची यांना सवय नसते. म्हणजे बोलतील पुष्कळ पण स्वतःविषयी खरं काही नाही… त्यामुळे हिला काय सगळं जमतं, येतं, हिला काय अडचणी असणार ? असे बाकीच्यांना वाटतं. ही आहे ना… आत्ता उरकेल एवढं काम… दहा पाहुणे येणारेत का? ही असल्यावर काय टेंशन? अशा एखाद्या होममेकरपासून ते नोकरी, संसाराचा तोल साधणाऱ्या करियारिस्ट, कलाकार, लेखिका ते मोठ-मोठे निर्णय घेणारी बिझनेस टायकुन असलेली एखादी खंबीर, कणखर स्त्री…
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्त्री जेवढी जास्त कणखर तेवढं तिला मनुष्यत्व नाकारलं जातं… जणू तिच्या कणखर असण्याची पुरेपूर किंमत तिला हा समाज आणि त्याहीपेक्षा अनेकदा तिचे जवळचेचं लोक मोजायला लावताना दिसतात. अर्थात याला अपवाद असतीलचं पण हे ही एक सत्य आहे हे नाकारता येत नाही.
लग्नातली हळद उतरून जाते पण या पिवळ्या रंगाचं देणं तिला आयुष्यभर द्यावं लागतं. Robert Frost सारखा कवी पण या पिवळ्या रंगाचा वापर The Road not taken to Yellow Woods साठी करतो… त्यातले कष्ट दाखवण्यासाठी करतो तर Van Gogh त्याची बहुतांश चित्र पिवळ्या रंगात रंगवतो…
स्त्रीला आपण एकतर हलका दर्जा देतो नाही तर एकदम देवीत्व बहाल करतो… ती एक दोन पावलं मागे चालावं नाही तर एकदम मखरात बसावं… पण मग तिने शेजारून बरोबरीने कधी चालावं? स्त्रीने कणखर असू नये असं म्हणणं नाही. उलट प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र असावं, कणखरचं असावं पण या कणखरपणाची तिला आयुष्यभर जी किंमत चुकवावी लागते त्याचा विचार आणि माणूस म्हणून कधीतरी तिचा विचार व्हावा एवढीचं अपेक्षा…
बघा परत अपेक्षा !! ठेवावी ना ?,…
– रश्मी पांढरे ( 9881375076 )
लेखिका प्रसिद्ध साहित्यिका आहेत.
तळ टीप :- इथे आपण आदिशक्तीचा जगर करतोय म्हणून मी स्त्रियांची व्यथा मांडली पण खरं तर हे सगळ्यांना लागू होत… अतिशय हुशार, अभ्यासू, आज्ञाधारक मुलांना, धडाडीच्या, कर्तबगार पुरुषांना… सगळ्यांनाच…