“गुलाबी”…. नुसत्या शब्दातचं किती जादू आहे ना?…. गुलाबी रंग… हळुवार प्रितीचा….प्रियाच्या नुसत्या आठवणीने गालांवर फुलणार्या गुलाबांचा… गुलाबी भावनांचा… प्रणयाचा… एकमेकांप्रती असलेल्या ओढीचा, काळजीचा आणि निरपेक्ष समर्पणाचा….
हा स्त्रीच्या कोमलतेशी जोडला गेलेला रंग पण या समजाला छेद देणारी उत्तर प्रदेशातली Action Packed करारी महिलांची “गुलाबी गॅग” हा स्त्रीत्वाचा एक वेगळाच रंग….
राजस्थान जिथे पाऊस हा एक उत्सव आहे, तिथे हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा एक वेगळाचं गुलाबी Undercurrent समजला, जो मनाला स्पर्शून गेला… तिथे हिंदू स्त्रियांना पावसात भिजण्यासाठी खास कच्च्या रंगांचे लेहेरीये तयार केले जातात जे पिढ्यान पिढ्या फक्त मुस्लिम रंगरेज बनवत आलेत खास हिंदू स्त्रियांसाठी… त्यातही नववधूंसाठी खास गुलाबी रंगाचे… म्हणजे मग ती पावसात भिजली की तो गुलाबी रंग तिच्या तनमनावर आणि आयुष्यावरही चढावा ही त्यामागची सुंदर भावना….
मानसशास्त्रीय दृष्ट्या, हा सकारात्मकतेचा, आशेचा, उबदार सेवा भावनेचा रंग आहे…. जीवनातं आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा, सगळं काही ठिक होईल असा आशादर्शक आणि म्हणून PINK Cancer Care Organisation ची आश्वासक गुलाबी रिबीन….
मला हा स्त्री चा प्रेमातल्या निरपेक्ष समर्पणाचा रंग वाटतो… मग तिचं ते प्रेम प्रियाप्रती असेल नाहीतर आपल्या समाजसेवी कार्याप्रती…
या सर्वांच्या मनावर या निरपेक्ष गुलाबी गुलालाची उधळण झालेली दिसते…
अशा किती गुलाबी मनाच्या स्त्रिया आठवाव्या?… अशक्य आशावादी असलेली हेलन केलर… विधवांना आणि त्यांच्या मुलांना सन्मानाचे आयुष्य देणार्या आद्य शिक्षिका आणि समाजसेविका सावित्रीबाई फुले… अनी बेझंट …सेवासदन संस्थापक रमाबाई रानडे… पंडिता रमाबाई सरस्वती ते प्रेम आणि त्यागमूर्ती मदर तेरेसा, नर्मदा आंदोलनाच्या मेधा पाटकर, अरुंधती राॅय, अरुणा राय ते आजची प्रत्येक स्त्री जी निरपेक्षपणे दुसर्याच्या विकासासाठी झटते…
गेले दोन वर्ष कोविडमधे सतत कार्यशील असलेले आपले मेडिकल कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर्स, स्वच्छ्ता कर्मचारी. अखंड सेवाव्रती माणसे ही! या सगळ्यांचा आहे हा गुलाबी रंग
या चराचराप्रती, मानवतेप्रती असलेल्या या सर्वांच्या निखळ प्रेम भावनेचा हा गुलाबी रंग…
या सर्व कोमल हृदयी आणि तरीही सशक्त शक्तीला त्रिवार वंदन….
© रश्मी पांढरे.
9881375076