फोटो सौजन्य - Pinterest
दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रज सरकारने भारताची संमती न घेता भारताला युद्धात सामील केले. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक वेळा इंग्रजांना विनंती करूनही त्यांनी स्वातंत्र्याची हमी दिली नाही. अखेर ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर एक ठराव मंजूर केला आणि गांधीजींनी “करेंगे या मरेंगे” (Do or Die) हे ब्रीद देत आंदोलन सुरू केले.
७ ऑगस्ट १९४२ रोजी संध्याकाळी मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आला की दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांपासून सत्ता मिळवण्याच्या मोहिमेत मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (आता ऑगस्ट क्रांती मैदान) एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाईल.
या चळवळीच्या नावाबद्दल बरीच चर्चा झाली. महात्मा गांधींना चळवळीचे नाव असे हवे होते की ते लोकांच्या मनात कोरले जाईल. यासाठी अनेक नावे सुचवण्यात आली. शेवटी ‘भारत छोडो’ ही घोषणा युसूफ मेहेरअली यांनी दिली.
संपूर्ण स्वराज्य या भावनेने प्रेरित होऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावायचं असं ठरल्यानंतर महात्मा गांधीनी करेंगे या मरेंगे आणि चले जाव या दोन क्रांतीकारी घोषणा दिल्या. पुढे याच घोषणेनं सारा भारत ढवळून निघाला आणि देशभरात इंग्रजांविरोधात असंतोष वाढत गेला.
युसूफने ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा देखील दिली होती.
९ ऑगस्ट १९४२ चं आंदोलन होऊ नये किंवा त्याची सुरूवात होऊ नये यासाठी इंग्रजांनी महात्मा गांधींसह जवळपास सर्वच बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेस इथं ठेवण्यात आलं होतं आणि इतर बड्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं होतं.
या देशव्यापी भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का बसला. भारतीय जनतेने ब्रिटिशांना हे स्पष्ट करून दिलं की, आता त्यांचं भारतात स्वागत नाही. या आंदोलनानंतर काहीच वर्षांत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.