

- संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तयारीदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.
- महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
- काँग्रेसचे काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तयारीदरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात पुन्हा फोडाफोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका तुलनेने अनुकूल दिसत असल्याने या पक्षातील काही खासदारही भाजपच्या संपर्कात गेल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाची भाजपशी थेट चर्चा झाली, तर आपल्याला काहीच मिळणार नाही, अशी भीती या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे भाजपला साथ देण्यास तयार असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांना पक्षांतरासाठी घटनात्मक संरक्षण हवे आहे. तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांसारखी आपली अवस्था होऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुमारे पाच खासदार भाजप नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत. या खासदारांकडून राजकीय संरक्षणाची मागणी केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचेही काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार या खासदारांनी केली आहे. निधी मिळविताना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजकारणासाठी मतदारसंघात विकासकामे करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारच्या मंजुरीशिवाय निधी मिळू शकत नाही. त्यामुळे विकासकामे रखडल्यास राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भाजपशी जुळवून घेणे ही आपली मजबुरी असल्याचे या खासदारांना वाटत आहे.
संसदेचे विशेष सत्र
पावसाळी अधिवेशन अद्याप संस्थगित करण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र पुन्हा बोलावण्याची विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यानुसार येत्या ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे सत्र बोलावण्याची विनंती करण्यात आली आहे. यात परिसीमन विधेयक मांडले जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्येच महिला आरक्षणासह लोकसभेचे मतदारसंघ वाढवण्याचे विधेयक मंजूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
समाजवादी पक्षातील खासदारांवरही भाजपची नजर?
उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाचे काही खासदार भाजपकडे आकर्षित होत असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये अधिक चांगल्या संधी मिळतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, या खासदारांना पक्षात घेण्याबाबत भाजप सावध भूमिका घेत असल्याचे सांगितले जाते. समाजवादी पक्षाची राज्यातील राजकीय वातावरणावर पकड मजबूत असून, सध्या त्यांचे खासदार भाजपमध्ये आल्यास आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खासदारांना पक्षात घेण्याबाबत भाजप विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
स्वेच्छेने भाजपमध्ये येणाऱ्याचे स्वागत
महाराष्ट्रातील एका वरिष्ठ भाजप नेत्याने या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, सरकार चालविण्यासाठी भाजपला कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. स्वेच्छेने भाजपच्या धोरणांशी सहमत होऊन कोणी पक्षासोबत येत असेल तर त्यांचे स्वागत आहे.
FAQ
1. महाराष्ट्रातील कोणत्या पक्षांच्या खासदारांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदारांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे.
2. कोणत्या पक्षाच्या संपर्कात खासदार असल्याचे सांगितले जात आहे?
काही खासदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
3. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे किती खासदार भाजपच्या संपर्कात आहेत?
सूत्रांच्या माहितीनुसार, या पक्षाचे सुमारे पाच खासदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.