'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

पुण्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवारांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Chandrashekhar Bawankule angry on Rohit Pawar comment on sunetra pawar.jpg
रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांवर टीका करताच चंद्रशेखर बावनकुळे यांचा संताप (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • रोहित पवार यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका

  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला संताप

  • रोहित पवारांचे बोलणे निर्लज्जपणाचे लक्षण असल्याचे म्हणत टीका

Maharashtra Politics : मुंबई : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सुरक्षा व कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांवर टीका केल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, रोहित पवार हे राज्याचे संस्कार, संस्कृती विसरले आहेत. सुनेत्राताई पवार यांना प्रशासन चालवता येत नाही. त्यांना पालकमंत्रिपद सांभाळता येत नाही, असं बोलनं हे रोहित पवार यांना शोभत नाही. सुनेत्रा पवार या आदर्श, संस्कारमय, प्रशासनाची जाण असलेल्या नेत्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पक्षावर, सरकारवर एक पकड तयार केली आहे. त्या आपल्या खात्याचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची दिवंगत नेते अजित पवार यांच्या राजकारणाशी तुलना केल्याने बावनकुळेंनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "सुनेत्रा पवार या आधी राजकारणात एवढ्या सक्रीय नव्हत्या. अनेकजण 25-25 वर्षे आमदार, खासदार राहूनही अनेकांना प्रशासनावर नियंत्रण मिळवता येत नाही. परंतु खूप कमी काळात सूनेत्रा पवार यांनी प्रशासनावर पकड मिळवली आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे राज्यातील जनतेला मान्य नाही. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलून स्वत:ची पत घालून घेतली आहे.”

पुणे महापालिकेचा थेट महापौरांनाच टोला! मंजुषा नागपुरेंच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत म्हणाले...

पुण्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीसांकडे देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. यावर रोहित पवार यांनी फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे वाटोळे होईल , अशी टीका केली. यावरून चंद्रशेखर बावनकुळे हे संताप व्यक्त करत म्हणाले, “रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार नाहीत. तसं पाहायचं झालं तर सुनेत्रा पवार या सक्षम आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पुण्याचे वाटोळे होईल, असे बोलणे निर्लज्जपणाचे लक्षण आहे.”

पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे दिलं तर वाटोळं होईल! रोहित पवारांनी सुनावलं, वाढती गुन्हेगारी गृहमंत्र्यांचं अपयश?

Q

पुण्याचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याची मागणी कोणी केली?

A

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे.

Q

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय विधान केले?

A

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे वाटोळे होईल, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

Q

रोहित पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

A

रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार सक्षम असल्याचे सांगत रोहित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.