दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक
Delhi Police arrrest CJP Leaders: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या दिल्लीतील आगमनाच्या आणि जंतर मंतर येथील नियोजित आंदोलनाच्या अगदी आधी, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीत अटक केल्याची माहिती समोर आली आहे. जंतरमंतर मैदान आंदोलन स्थळ म्हणून रद्द करण्यात आल्यानंतरही तिथे जाऊन घोषणाबाजी केल्याप्रकरणी आणि तिरंगा फडकावल्याप्रकरणी तुरुंगात टाकल्याचे सांगितले जात आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या सौरव दास आणि आशुतोष रांका न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सौरव, आशुतोष आणि अजिंक्य यांच्या अटकेवर सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे. तिरंगा फडकावणे हा अपराध आहे का, तिरंगा फडकावणे हा गुन्हा असेल तर नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगाव, ही आरएसएसची विचारधारा आहे. यांनी स्वत:ची कितीतरी वर्षे त्यांच्या शाखेरवर तिरंगा फडकावला नव्हता. त्यामुळे त्यांना आजही तिरंग्याशी प्रॉब्लेम आहे. आजही त्यांना डिटेन केलं आहे. त्यांना कुणाशीही बोलू दिले जात नाहीये. त्यांचे फोनही हिसकावून घेतले गेले आहेत. वकिलांशी भेटू दिले जात नाहीये. एकप्रकारे त्यांचे अपहरण केलं गेलं आहे. ते कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये आहेत, हेही सांगितले जात नाहीये. असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.
तसेच,”माझ्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबून किंवा जंतरमंतर बंद करून आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.” असं सूचक विधानही अभिजीत दिपके यांनी केलं आहे.
यापूर्वी, शनिवारी (१० ऑक्टोबर), जेव्हा अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीत दाखल झाले, तेव्हा पोलिसांनी त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले आणि नंतर जामिनावर सोडण्यातही आले. सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाने आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता सोमवारी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली होती. पण बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे, पोलिसांनी जंतर मंतर घटनेच्या संदर्भात अजिंक्य शिंदे यांच्यासह या दोन प्रमुख नेत्यांना अटक केली. योगायोगाने, आज (१४ ऑक्टोबर) आशुतोष रांका यांचा वाढदिवस देखील आहे.






