‘DJ बंद करून दाखवा’; सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान
DJ Ban Controversy : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात DJ, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ध्वनीप्रदूषण, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि सणांच्या पारंपरिक स्वरूपावरून वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी DJ आणि डॉल्बीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावरून आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचं आवाहन केलं. गणपती श्रद्धेने घरी आणल्यानंतर विसर्जनाच्या वेळी मोठ्या आवाजात DJ लावून नाचण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार आक्षेप घेतला. DJ वाजवण्यावर सरसकट बंदी घालण्याची भूमिका योग्य नसल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं.
ते म्हणाले, “भीम जयंती हीच दिवाळी आहे. DJ वाजणारच. कायद्याची पायमल्ली कोणी करत नाही. राज ठाकरेंना माझं आव्हान आहे की, DJ बंद करून दाखवा. राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का? DJ वाजवण्यावर बंदी आली पाहिजे, असं नाही. DJ संदर्भात कोणाला काही त्रास होत असेल तर मला कॉल करा. दरम्यान, काही सामाजिकदृष्ट्या कायदेशीर बदल अपेक्षित आहेत. भारतीय संविधानाने सणवार साजरे करण्याचे नियम दिले आहेत,” असे ते म्हणाले.
दुसरीकडे, राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपावर भर दिला आहे. ते यावेळी म्हणाले, “याबाबत मी कधीच भूमिका घेतली होती. कसले डॉल्बी वगैरे लावत आहात? कसले DJ? आपल्या पारंपरिक पद्धतीने सण का साजरे होत नाहीयत? इतक्या श्रद्धेने गणपती घरी आणायचा आणि विसर्जन करताना नाचता? कसला आनंद होतोय? यात कसला आनंद साजरा करताय?”
“माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. मुलांसाठी मी तो आणला. ज्यावेळी गणपती जातो, तेव्हा घर ओकंबोकं वाटतं. उत्साह गेल्यासारखा वाटतो. वाईट वाटतं त्यावेळेला. मग वाईट वाटण्याऐवजी कसला उत्साह साजरा करताय?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJ-डॉल्बीचा मुद्दा आता केवळ ध्वनीप्रदूषणापुरता राहिलेला नसून त्याला राजकीय रंगही मिळताना दिसत आहे. सदावर्तेंच्या या टीकेवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.






