India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला, सौजन्य : आयएएनएस
गृहमंत्रालयाने जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास बंदी घातली असून त्याऐवजी इतर तीन जागांची निवड केली आहे. या नव्या तीन जागांमध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मात्र इंडिया आघाडी (India Allience)च्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारची घाबरगुंडी उडालीय, हे यातून स्पष्ट होते असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल, तेच होईल. तर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, यातून हे स्पष्ट होते की, केंद्र सरकार घाबरले आहे. त्यांना लोकांचा आवाज दाबायचा आहे, पण लोकशाहीत जनतेचा आवाज केव्हाच दाबता येत नाही. आमचे आंदोलन सुरूच राहिल.
तसेच काँग्रेसचे खासदार इमरान मसूद हे जंतर-मंतरचे नाव आंदोलन स्थळ यादीतून वगळल्यानंतर उपरोधिकपणे म्हणाले की, मग आता आम्ही हिमालयाचे शिखर गाठत तेथे आंदोलन करणार.
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, इतकी वर्षे आंदोलनासाठी निश्चित असलेली जागा, ती आपण अशाप्रकारे अचानक बंद करता. तर आता देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक टोक जंतर-मंतर बनेल. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही.
तसेच काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी म्हणाले की, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाहीची रक्षा करणे आणि निवडणूक व्यवस्था पारदर्शक बनवण्याची ही लढाई आहे. या लढाईत, आम्ही प्रत्येक चौक, प्रत्येक टोकापर्यंत जाऊ ज्यामुळे लोकशाही ओळखली जाते. त्यातीलच एक स्तंभ सर्वोच्च न्यायालयही आहे.
बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, आम्हीच सर्वात आधी एसआयआरविरोधात लढाई सुरू केली होती. त्याची सुरुवात बिहारमधून झालेली. आता सर्व सत्य समोर आले आहे. लोकशाहीवर हल्ले होत असून ती पायाखाली तुडवली जात आहे. हे सर्व पाहता आम्ही गप्प बसणार नाही.
तर दुसरीकडे, काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला म्हणाले की, आम्ही सीजेआयने सांगितलेल्या अनेक गोष्टीनुसार पुढे गेलो व याचिका दाखल केल्या. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. तसेच काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, हे आंदोलन तर अनेक दिवसांपासून सुरू आहे. राहुल गांधी यांनी जेव्हा इंदिरा गांधी भवनात पहिल्यांदा एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हापासून हा विषय देशभरात गाजत आहे.
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले की, भाजप घाबरलं आहे. त्यांना ठाऊक आहे की, आता त्यांच्याकडे जास्त काळ सत्ता राहणार नाही. त्यामुळे ते आता त्यांना हवे ते निर्णय घेत आहेत.






