Audio Clip of Akshay Shinde's Encounter Eyewitness
ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. दोन चिमुकल्यांवर अत्याचार केलेल्या अक्षयला भरचौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी होत होती. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये अक्षयचा एन्काऊंटर झाला. पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर हा कट होता की एन्काऊंटर असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. आता याबाबत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने प्रसंग सांगितला आहे.
एक आठवड्यापूर्वी झालेल्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन राजकारण तापले आहे. पोलिसांनी मुद्दाम एन्काऊंटर करुन इतर आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्वीटर हॅन्डलवरुन ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. शेअर करताना आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
काय आहे ऑडिओ क्लीपमध्ये?
ऑडिओ क्लीपमध्ये बोलणारा तरुण हा स्वतःला अक्षय शिंदे एन्काऊंटरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून सांगत आहे. यावेळी तो दुचाकीवरुन त्याच्या मेव्हाण्यासोबत रॅलीसाठी जात असल्याचे देखील तो तरुण सांगत आहे. हा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती म्हणतो की, मी तुम्हाला काही व्हॉट्सअप मेसेज केले होते. पण नंतर मी घाबरलो आणि ते सर्व मी डिलीट केलं. त्यामध्ये माझी काही ऑडिओ क्लीप होत्या. मी आता सुद्धा घाबरलो आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, त्याच्या मागे माझी गाडी होती. मी हे सांगितल्यावर लोकं माझ्या देखील मागं लागतील. पोलिसांच्या गाडीच्या मागे मी आणि माझा मेव्हाणा गाडीवर होतो. मुंब्राच्या आसपास त्यांची व्हॅन आम्हाला ओव्हरटेक करून गेली. त्या पोलीस व्हॅनच्या सर्व खिडक्यांनी पडदे लावले होते. त्यामुळे आतले काही दिसत नव्हते.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
गाडी आमच्या पुढे गेल्यानंतर कसला तरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं गाडीच्या पार्टचा कोणता आवाज आला असेल, तीन वेळा तसा ठक् ठक् आवाज आला. मी थोडा घाबरलो, म्हटलं काहीतरी विषय झाला असावा. पोलिसांनी गाडी थांबवली, ते बाहेर आले. दोन पोलिसांनी त्याला बाहेर आणलं, त्याला नंतर बंद केलं, पुन्हा ते निघून गेले. त्यांच्या अंगावर वर्दी नव्हती. नॉर्मल कपड्यांमध्ये होते. पुन्हा एकदा आवाज आला. मग आम्ही घाबरलो. पुन्हा आम्ही गाडी ओव्हरटेक केली आणि पुढे निघून गेलो. तुमच्याशी बोलताना पुढे काही होऊ नये यासाठी आत्ता पण मला भीती वाटते आहे.
तेव्हा हे ऐकून आम्ही घाबरलो. माझ्या मागे बसलेले मेव्हणा देखील घाबरला. तो म्हणाला रॅलीमध्ये चाललो आहे तर लवकर गुपचूप चला. त्यानंतर आम्ही आलो, नंतर आम्ही मोबाईल पाहिला, की अक्षय शिंदेची बातमी येत आहे. त्यानंतर आम्ही विचार केला की, हे कोणाला सांगावं, तुमच्यावर विश्वास होता. पोलिसांनी जाणून बुजून रॅलीच्या वेळी मारलं आहे, त्याला. तिथे आसपास सीसीटीव्ही कॅमेरे असतील ना! मी सांगतो ही घटना कुठे घडली आहे ती. दर्गा आहे ना. तिथे छोटा डॅम होता. फकीरशहा च्या इथून थोडं पुढे गेल्यानंतर ठक् असा आवाज आलाय, असे सर्व जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये आहे.