yogesh kadam press conference live pune swargate molestation case
मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास गावाकडे चालेल्या तरुणीला फसवून बंद असलेल्या गाडीमध्ये अत्याचार केला. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर नराधम दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र या प्रकरणावरुन जोरदार रोष व्यक्त करण्यात आल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आढावा घेत पाहणी केली. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण रंगले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी घटनेची माहिती देत पोलिसांच्या कारवाईची देखील माहिती दिली होती. यावेळी योगेश कदम यांनी पोलिसांनी गस्त घातली होती. तसेच पोलीस स्टेशनचे पीआय हे स्वतः दोनवेळा गस्त घालत होते अशी माहिती योगेश कदम यांनी दिली होती. यावेळी त्यांनी पीडित मुलीने कोणताही आरडाओरडा केला नाही. यामुळे आरोपीला क्राईम करताना सोपे गेले असे वक्तव्य केले. योगेश कदम यांच्या या वक्तव्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले योगेश कदम?
माध्यमांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचे देखील ते म्हणाले आहेत. योगेश कदम म्हणाले की, “आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिला अत्याचाराबाबत झिरो टोलरन्स हे आमचे पहिल्या दिवसापासूनचे धोरण राहिले आहे. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पोलीस आयुक्तांच्या मी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत. महिला अत्याचार प्रकरणात आरोपीविरोधात कडक कारवाई करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत.” असे योगेश कदम म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “काल मी जे विधान केले, त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात आहे. स्वारगेट आगारात मी जेव्हा काल भेट दिली, तेव्हा मला दिसले की, ती रहदारीची जागा होती. रहदारीचा परिसर असून आमच्या भगिनीवर अत्याचार होत असताना कुणीच कसे मदतीसाठी आले नाही, हा प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यांनी मला जे उत्तर दिले, ते मी पत्रकार परिषदेत सांगितले. पण माझ्या विधानाचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे”, असेही योगेश कदम म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
योगेश कदम म्हणाले की, “मी कालदेखील म्हटले होते की, आरोपी जेव्हा पकडला जाईल, तेव्हा त्याच्यावर कडक कारवाई केली पाहीजे. त्यामुळे आरोपीला वाचविण्यासाठी मी कोणतेही विधान केलेले नाही. उलट त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस दोन दिवसांपासून मेहनत घेत होते. पोलिसांची कारवाई योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी स्वारगेटचा दौरा केला होता. कडक कारवाई करा, या सूचना देण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आरोपीला वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता, हे आरोप धादांत खोटे आहेत.” अशा शब्दांत योगेश कदम यांनी आपली बाजू मांडली आहे.